
मेडिअकरमध्ये दोन हजार ३५० व्या मुलीच्या जन्माचे स्वागत
उंड्री : मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत आणि प्रसुतीचा शून्य खर्च ही परंपरा मागिल अकरा वर्षांपासून सुरू आहे. आज (रविवार, दि. २२ मे, २०२२) हॉस्पिटलमध्ये दोन हजार ३५० वी मुलगी जन्माला आल्याचे सांगताना आनंद होत असल्याचे हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गणेश राख यांनी सांगितले. प्रतिक्षा रवींद्र लोखंडे (रा. साडेसतरानळी, हडपसर, पुणे) यांना मुलगी झाल्यानंतर हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स आणि मुलीचे गुलाब-पुष्पांच्या वर्षावात स्वागत केले. या स्वागतोत्सवामुळे मुलीच्या नातेवाईकांनीही घरी जाऊन पुन्हा तिच्या जन्माचे स्वागत केल्याने परिसरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्याचबरोबर नवजात मुलीच्या कुटुंबीयांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स, सिस्टरसह सर्वांना मिष्ठान्न भोजन देऊन समाधान व्यक्त केले. डॉ. गणेश राख म्हणाले की, मुलीचा जन्म झाल्यानंतर चेहरा पाडणे, जन्मदात्रिला त्रास देणे, वंशाला दिवा हवा ही मानसिकता बदलण्यासाठी मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर शून्य खर्च हा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला त्रास झाला, मात्र त्यामध्ये सातत्य ठेवल्याने हडपसरच नव्हे, तर जगभरात या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे. जगभर चार लाख डॉक्टर्स, तेरा हजार सामाजिक संस्था व पंचवीस लाख स्वयंसेवक या उपक्रमामध्ये सहभागी होऊन मुलींच्या जन्माचे स्वागत करीत आहेत. शिक्षिक-अशिक्षितांनाही मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता दोन्ही अपत्याचे तितक्याच आनंदाने स्वागत करायला लावण्याची भूमिका बदलण्यात काही अंशी का होईना यश मिळाले, असे त्यांनी स्पष्ट केले
Web Title: Birth Of 2350th Girl In Medicare Hospital Dr Ganesh Rakh Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..