पुणे : रवींद्रनाथ पाटील व पंकज घोडे विरोधात 4500 पानी दोषारोपपत्र दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bitcoin currency fraud case arrested Rabindranath Patil and Pankaj Ghode

पुणे : रवींद्रनाथ पाटील व पंकज घोडे विरोधात 4500 पानी दोषारोपपत्र दाखल

पुणे : बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेला माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील आणि सायबर तज्ज्ञ पंकज प्रकाश घोडे यांच्या विरोधात पुणे सायबर पोलिसांनी साडेचार हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्यासंदर्भात आत्तापर्यंत एकूण २५ साक्षीदार यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात सोमवारी हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पाटील याच्याकडून आत्तापर्यंत विविध ३४ प्रकारची सहा कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आली आहे. त्याने त्याचे कुटुंबीय व नातेवाईक यांच्या नावावर क्रिप्टोकरन्सीचे वॉलेट काढून त्यात आरोपींच्या त्यातून बीटकॉईन वर्ग केल्याचे तपासातून पुढे आले आहे. याप्रकरणी पाटील याची पत्नी कांचन पाटील आणि भाऊ अमरनाथ पाटील यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामणी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

कोण आहे रवींद्र पाटील :

पाटील याचे अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण झालेले असून तो सन २००२ बॅचची केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. सुरवातीला त्याला जम्मू-काश्मीर कॅडेर मिळाले होते. मात्र, आायपीएसच्या नोकरीत पाटील याचे मन रमले नाही. त्यामुळे त्याने अल्पावधीत राजीनामा देऊन खासगी कंपनीत रुजू झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील के.पी.एम.जी. या नामांकित कंपनीत तो ई-डिस्कव्हरी, सायबर तज्ज्ञ म्हणून वरिष्ठ पदावर काम करत होता. चीनमधील हाँगकाँग येथेही त्याने काही काळ काम केले. पुणे पोलिसांकडे २०१७ मध्ये अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांच्या विरोधात दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बिटकॉईनच्या गुन्ह्यात तो पुणे पोलिसांसाठी सायबर तज्ज्ञ म्हणून काम करत होता. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करताना त्याने आरोपींच्या खात्यावरील क्रिप्टोकरन्सी परस्पर इतर खात्यात वळविल्याचे तसेच खात्यावर कमी बीटकॉईन असल्याचे स्क्रीनशॉट दाखविल्याचे केवायसीच्या रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. पाटील याने २३६ बीटकॉईन इतरत्र वळविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

कोट्यवधी रुपयांच्या सहा वेगवेगळ्या कंपन्या केल्या स्थापन :

घोडे हा ग्लोबल ब्लॅकचेन फाउंडेशन कंपनी चालवत होता. सायबर तज्ज्ञ म्हणून पोलिसांसोबत काम करताना त्याने देखील आरोपींच्या खात्यातून बीटकॉईन इतरत्र वळवून फसवणूक केली आहे. आरोपींच्या खात्यावर बिटकॉईन शिल्लक असतानाही बिटकॉईन नसल्याचे स्क्रीनशॉट त्याने पोलिसांना दिले असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या क्रिप्टॉकरन्सी वॉलटच्या तपासणीत त्याने हजारो युरो, डॉलरचे परदेशात व्यवहार केल्याचे दिसून आले आहे. सिंगापूर आणि ब्रिटनमधील त्याच्या मित्रांच्या बँक खात्याची चौकशी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीत त्याने गुंतवणुक केल्याचा पोलिसांना संशय आहे. अल्पावधीत कोट्यवधी रुपयांच्या सहा वेगवेगळ्या कंपन्या त्याने सुरू केल्या होत्या. मात्र त्याने आयकर विभागाकडे कोणतेही रिटर्न भरले नसल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Bitcoin Currency Fraud Case Arrested Rabindranath Patil And Pankaj Ghode

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top