भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी
Published on

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी

‘मिशन २०२९’साठी
जुन्या-नव्यांचा मेळ

पीयूष गोयल कोषाध्यक्ष
विनोद तावडे सरचिटणीस
भारती पवार उपाध्यक्ष

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १७ : भाजपने २०२९ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. त्यामध्ये नव्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात संधी देतानाच, राम माधव, स्मृती इराणी, वसुंधराराजे शिंदे यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही पुनरागमन केले आहे. खासदार विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम असून, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नितीन नवीन यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर २०९ दिवसांनी कार्यकारिणी जाहीर केली आहे. सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून प्रीती गांधी यांना संधी देण्यात आली आहे. तर छत्तीसगडच्या दीपक म्हस्के यांना या विभागाचे संयोजक बनवण्यात आले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत दीर्घकाळानंतर राम माधव यांना स्थान मिळाले आहे. कार्यकारिणीत उत्तर प्रदेशातील नेत्यांचा दबदबा असून युवा नेत्यांना प्रामुख्याने संधी देण्यात आल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडिया विभागाचे काम आतापर्यंत अमित मालवीय पाहत होते. ही जबाबदारी दीपक म्हस्के यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रसारमाध्यम संयोजक म्हणून अनिल बलुनी यांना नेमण्यात आले असून सहसंयोजक म्हणून आशिष अगरवाल, प्रदीप भंडारी व सिद्धार्थ यांना स्थान देण्यात आले आहे. सोशल मीडिया सह संयोजक म्हणून प्रीती गांधी, शिवानंद द्विवेदी, आलोक भट व अरुण यादव यांना नेमण्यात आले आहे.
नितीन नवीन यांच्या नव्या टीममध्ये एकूण १३ जणांना उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे. त्यात भारती पवार, वसुंधराराजे शिंदे, तीरथसिंह रावत, राम माधव, वैजयंत पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन दोशी, सरदार मनप्रीतसिंह बादल, लालसिंह आर्य, एम. नागराज, तारिक मन्सूर आणि डॉ. मधुचंद्र कर यांचा समावेश आहे. संघटन सरचिटणीस पदाची बी. एल. संतोष यांच्याकडील जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे यांच्यासह सुनील बन्सल, विप्लवकुमार देव, स्मृती इराणी, सतीश पुनिया, गजेंद्र पटेल, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया यांना स्थान देण्यात आले आहे.
पक्षाने १६ नेत्यांना चिटणीस बनवले आहे. यात कविता पाटीदार, के. सुरेंद्रन, भोला सिंह, प्रदीप वर्मा, जगदीश पटेल, संदीप पाठक, फांग्नोन कोन्यक, संगीता यादव, अनिल अँटनी, एम. व्यंकटेशन, मनोज टिग्गा, सिद्धार्थ शंभू, स्वदेश सिंह, मृगांका देव बर्मन, रोहन गुप्ता आणि जयप्रकाश यांचा समावेश आहे. राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष पदाची जबाबदारी राजेश मंगल देण्यात आली असून, राष्ट्रीय कार्यालय प्रभारी पद तरुण चूघ यांना देण्यात आले आहे. महेंद्र पांडे हे कार्यालय चिटणीस म्हणून काम पाहतील. ईशान्य भारत संयोजक म्हणून संबित पात्रा तर सहसंयोजक म्हणून राजीव बब्बर काम पाहतील. प्रकोष्ट संकुल संयोजक आणि सहसंयोजक पदाची जबाबदारी अनुक्रमे विष्णूदत्त शर्मा आणि ऋतुराज सिन्हा यांच्याकडे देण्यात आली आहे.

युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी डॉ. हेमांग जोशी
पक्षाने विविध मोर्चाच्या अध्यक्षांची यादीही जाहीर केली असून युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून गुजरातच्या डॉ. हेमांग जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून रुपकुमारी चौधरी छत्तीसगड यांना नेमण्यात आले आहे. ओबीसी आणि किसान मोर्चाचे काम अनुक्रमे अमरपाल मौर्य (उत्तर प्रदेश) आणि बन्सीलाल गुर्जर (मध्य प्रदेश) पाहतील. अनुसूचित जाती मोर्चाचे काम बिहारचे शिवेशकुमार राम हे पाहतील तर अनुसूचित जमाती मोर्चाचे काम राजस्थानचे डॉ. मन्नालाल रावत पाहतील. अल्पसंख्याक मोर्चाची जबाबदारी कुंवर बासित अली यांच्याकडे देण्यात आली आहे.

....

कार्यकारिणीची वैशिष्ट्ये
- नव्या कार्यकारिणीत ५१ नवे चेहरे
- आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना वगळले
- सहा वर्षांनंतर राम माधव पुन्हा कार्यकारिणीत
- पश्चिम बंगाल निवडणुकीतील यशानंतर स्मृती इराणी आणि विप्लव देव यांना सरचिटणीसपदाची बक्षिसी
- कार्यकारिणीमध्ये सर्वाधिक १० जण दिल्लीतील आहेत, तर आठ जण उत्तर प्रदेशातील आहेत.


६५
कार्यकारिणीतील नावे


माजी मुख्यमंत्री

१८
खासदार

१२
महिला


मुस्लिम समाजातील नेते

...
वयोगट


४० वर्षांखालील

१५
४० ते ५९ वयोगटातील

४४
५९ वर्षांवरील

....
महाराष्ट्रातील नावे
- भारती पवार (उपाध्यक्ष)
- पीयूष गोयल (कोषाध्यक्ष)
- विनोद तावडे (सरचिटणीस)
- शिवप्रकाश (सह-सरचिटणीस-संघटना)
- प्रीति गांधी (सोशल मीडिया सहसंयोजक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com