फडणवीस व पाटलांचा डाव यशस्वी होणार का? महाविकासआघाडी बाजी मारणार...

मंगेश कोळपकर
Monday, 9 November 2020

पदवीधर मतदारसंघासाठी पुण्यातून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख, नागपूरमध्ये महापौर संदीप जोशी आणि औरंगाबादमध्ये सतीश बोराळकर यांना भाजपने सोमवारी सकाळी उमेदवारी जाहीर केली आहे.

पुणे ः पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्याचप्रमाणे तीनपैकी दोन जागा ताब्यात ठेवतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेली एक जागा हिसकावून घेण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या पक्षसंघटनेचीही ताकद दिसून येणार आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पदवीधर मतदारसंघासाठी पुण्यातून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख, नागपूरमध्ये महापौर संदीप जोशी आणि औरंगाबादमध्ये सतीश बोराळकर यांना भाजपने सोमवारी सकाळी उमेदवारी जाहीर केली आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी डॉ. नितीन धांडे यांना उमेदवारी मिळाली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांचे उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत.

देशमुख हे मराठा समाजातील असून, त्यांना उमेदवारी देताना भाजपने जातीय समतोलही पाळला आहे. जोशी आणि बोराळकर ब्राह्मण समाजातील आहेत. पुणे मतदारसंघासाठी भाजपमध्ये देशमुख, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि शहर सरचिटणीस राजेश पांडे यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा होती. पुण्यातून सर्वाधिक मतदान असल्यामुळे पुण्यातील उमेदवार द्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी पक्षसंघटनेकडे धरला होता. त्यातच पुण्यातून मराठा समाजाला उमेदवारी मिळणार असल्याचे निश्‍चित झाल्यामुळे देशमुख- मोहोळ यांच्यात तीव्र स्पर्धा होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांची शिफारस लावून धरल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे. त्यातच या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील या पूर्वी विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा शब्द अंतिम ठरला. परिणामी देशमुख यांना उमेदवारी मिळाली. देशमुख हे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत.

नागपूर मतदारसंघात भाजपचे अनिल सोले हे विद्यमान आमदार होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वारसदार, अशी मतदारसंघात त्यांची प्रतिमा होती. परंतु, त्यांना बदलून संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जोशी हे नागपूरचे महापौर आहेत. त्यांच्यासाठी फडणवीस यांनी आग्रह धरला होता. पक्षासाठी "सेफ' असलेल्या नागपूर मतदारसंघातून जोशी यांची उमेदवारी निर्णायक ठरली. या मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार त्यांना लढत देईल.

औरंगाबाद मतदारसंघात पक्षाचे कार्यकर्ते आणि उद्योजक शेखर बोराळकर यांच्यावर पक्षाने पुन्हा एकदा विश्‍वास टाकला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण विद्यमान आमदार आहेत. पक्ष त्यांनाच पुन्हा संधी देईल, अशी चर्चा आहे. बोराळकर यांचा या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे यंदा उमेदवार बदलण्यात येईल, अशी चर्चा होती. परंतु, ती फोल ठरली. त्युाळे चव्हाण-बोरोळकर असाच सामना यंदा पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचे भाजपने यंदा पहिल्यांदाच ठरविले आहे. गेल्या वेळेस श्रीकांत देशपांडे यांना भाजपने पाठिंबा दिला होता. मात्र, यावेळी विदर्भ यूथ वेल्फेअरच्या सोसायटीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या धांडे यांच्यावर पक्षाची भिस्त असेल. अमरावतीमधील श्रीशिवाजी शिक्षण संस्थेनंतरची सर्वात मोठी संस्था म्हणून विदर्भ यूथ वेल्फेअर सोसायटीचा लौकीक आहे. त्यात सक्रिय असल्यामुळे आणि त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क हा भाजपच्या दृष्टिने जमेची बाजू आहे. मात्र, या मतदारसंघातील लढतीचे नेमके चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अशी असेल निवडणूक
- उमेदवारी अर्ज दाखल - 12 नोव्हेंबरपर्यंत
- छाननी - 13 नोव्हेंबर
- अर्ज मागे घेण्याची मुदत - 17 नोव्हेंबर
- मतदान - 1 डिसेंबर
- मतमोजणी - 3 डिसेंबर

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp announces candidate for graduate constituency