भाजपमध्ये असंतोषाचा भडका! तिकीट कापल्याने अनेकांचा आक्रोश व संताप
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ३० : शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या प्रचार कार्यालयात प्रचंड गोंधळ झाला. ‘तिकीट फिक्स आहे, तुम्ही कामाला लागा’ असा शब्द दिल्यानंतर ऐनवेळी तिकीट कापून भलत्यालाच उमेदवारी दिल्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अवघे प्रचार कार्यालय डोक्यावर घेतले. याच गडबडीत एका नाराज व्यक्तीला पेट्रोल भरलेल्या बाटलीसह पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज सकाळी दहा वाजता युती तुटल्याची घोषणा केली. पाठोपाठ ११ वाजता भाजपच्या प्रचार कार्यालयात मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉ. भागवत कराड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पक्षाची बाजू मांडली. हे नेते कार्यालयातील ‘व्हीआयपी’ कक्षात जाऊन बसले असतानाच नाराज कार्यकर्त्यांनी प्रचार कार्यालयात येत संतापला वाट करून दिली. प्रभाग क्रमांक २० मधून इच्छुक आणि तयारी केलेल्या दिव्या मराठे ओरडतच प्रचार कार्यालयात आल्या. मंत्री सावे यांना मला जाब विचारायचा आहे, असे सांगत ३० वर्षांपासून आपण पक्षात काम करत आहोत, असे असताना मंत्र्यांच्या जवळच्या एका व्यक्तीला तिकीट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मला तयारी करायला सांगून ऐनवेळी तिकीट का नाकारले? माझ्यावर अन्याय का केला? बाहेरून आलेल्यांना पैसे घेऊन तिकीट देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
सुवर्णा बदाडे या इच्छुक महिलेने प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या पक्षातून आलेल्या उपऱ्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला. त्यांनी हमसून हमसून रडायला सुरवात केली. सावे, कराड बसलेल्या दालनात जाब विचारण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला असता महिला पोलिसांनी बदाडे यांना रोखले. भाजपच्या दुसऱ्या महिला पदाधिकारी व अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी उपमहापौर लता दलाल यांनी या महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बदाडे यांना भोवळ आली. त्यांना पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न महिला पोलिस कर्मचारी करीत होत्या.बदाडे यांना धीर देताना ‘तुम्ही अर्ज भरा आणि माघार घेऊ नका, आपण यांना पाडू,’ असे लता दलाल म्हणत होत्या. पण मी इथून हटणार नाही, आत्मदहन करेन, असे म्हणत बदाडे यांनी ठिय्या दिला. यानंतर त्यांना रिक्षात बसवून नेण्यात आले.
पक्षासाठी नोकरी सोडली!
हा गदारोळ सुरू असतानाच श्रीअण्णा भंडारी हेही उमेदवारी दिली नाही म्हणून तेथे दाखल झाले. त्यांनी आरडाओरड करण्यास सुरवात केली. त्यांनी आपण इतकी वर्षे भाजपमध्ये काम करतो, पण अशी वागणूक मिळाली, असे सांगत पक्षासाठी आपण नोकरी सोडली आणि आज बाहेरून आलेल्यांसाठी पक्षाने आम्हालाच वाऱ्यावर सोडले, असा आरोप करीत मंत्री सावे, खासदार कराड यांच्या कक्षाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिस व इतर कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, यावेळी झालेल्या झटापटीत ‘व्हीआयपी’ कक्षाचे दार लाथ मारून तोडण्यात आले.
लता दलालही संतापाने धगधगत होत्या. तिकीट वाटपात मोठा घोळ झाला असून ओबीसी महिला वॉर्ड आरक्षित असताना तिथून ओपन महिलेला उमेदवारी कशासाठी दिली? जिथे खुला वॉर्ड आहे, तिथे ओबीसी महिलांना उमेदवारी असे प्रकार झाले आहेत. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे. तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाली आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.
सावे, कराड मागच्या दाराने रवाना
कार्यकर्त्यांचा हा गोंधळ टिपेला पोचत असल्याने अतुल सावे आणि डॉ. भागवत कराड यांना मागच्या दाराने रवाना करण्यात आले. दुपारी दीडपर्यंत हा सारा गोंधळ सुरू होता. तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिव्या मराठे यांनी भाजपच्या प्रचार कार्यालयातच उपोषणाला सुरवात केली.
‘राष्ट्रवादी’ने जवळ केले
श्रीअण्णा भंडारी आणि त्यांच्या पत्नी श्रद्धा यांनी संतापाच्या भरात दुपारी एकच्या दरम्यान भाजप कार्यालय सोडले. लगोलग राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाने त्यांना ‘एबी’ अर्ज दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

