भाजप नेत्यांचे डोळे उघडणारा कौल | Election Results 2019

ज्ञानेश सावंत  
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

चंद्रकांत पाटील आणि कोथरूड ‘सेफ’ समजणाऱ्या भाजप नेत्यांना डोळे उघडण्यास भाग पाडले !

पुणे - तब्बल दीड लाखाचे मताधिक्‍य घेऊन विधानसभेत पाऊल ठेवण्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इरादा कोथरूडकरांनी निकालातून हाणून पाडला. पाटील यांना २५ हजारांची आघाडी म्हणजे १ लाख पाच हजार मते पुणकेरांनी देत नेतृत्वाची संधी दिली. पण, मनसेच्या किशोर शिंदे यांच्या पारड्यात सुमारे ८० हजार मते दिली. त्यामुळे पाटील आणि कोथरूड ‘सेफ’ समजणाऱ्या भाजप नेत्यांना डोळे उघडण्यास भाग पाडले ! त्याअर्थी ‘घरचा’ की ‘बाहेरचा’ याचा फैसला मतदारांनी काहीअंशी केला; मात्र, आपल्या निष्ठा गळू न दिल्याने भाजपला हा गड राखता आला. 

कोथरूडमधील मतदारांना गृहीत धरून आमदार मेधा कुलकर्णींचे तिकीट कापले. पाटील यांच्या नव्या राजकीय ‘इनिंग’ची घोषणा केली. स्वपक्षासह मतदारांनी स्वीकारल्याचे सांगत पाटील यांनी कोथरूडचा गल्लीबोळ पालथा घातला. मताधिक्‍याचा १ लाख ६० हजारांचा आकडा बाहेर काढला. मतांची गोळाबेरीज करून स्थानिक भाजप नेतेही पाटील यांच्या सुरात सूर घालून दीड लाखांचं मताधिक्‍य जाहीर करीत होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून पाटलांनी शिंदे यांच्याविरोधात दहा हजार मतांची आघाडी घेतली. मात्र, दहाव्या फेरीत शिंदे यांनी ही आघाडी पावणेसहा हजार मतांवर आणली. त्यानंतरच्या अकराव्या फेरीत पाटील जेमतेम तीन हजार ९६७ मतांनी पुढे होते. पुढच्या फेरीतही पाटील यांना ही आघाडी साडेसहा हजार मतांपर्यंत नेता आली. त्यानंतर भाजपची हक्काची ‘वोट बॅंक’ असलेल्या मयूर कॉलनी, आयडीएल, डाहाणूकर कॉलनी, एरंवडणा, प्रभात रस्ता भागांतून पाटील यांनी पुन्हा १२ हजार मतांची आघाडी घेतली. ती अखेरच्या २० फेरीला २५ हजार ७६७ मतांची राहिली. या आघाडीने पाटील यांच्या नावावर एक लाख ४ हजार मतांची नोंद झाली, तर शिंदे यांना कोथरूडकरांनी ७९ हजार मते दिली. मागील निवडणुकीत आमदार कुलकर्णी यांना ५४ हजारांचे मताधिक्‍य होते. त्याच्या निम्मे पाटलांना मिळाले नसल्याने कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ यांची नाराजी भोवल्याचे पक्षातून सांगण्यात येत आहे. 

भाजपची ताकद असलेल्या भागांत ‘नोटा’चे बटण दाबले गेल्याचे आकडे पुढे आले आहेत. त्याचवेळी शिंदे यांच्या स्थानिक उमेदवारीचा मुद्दा लावून धरण्यात यश आल्याने भाजपचीही मते त्यांच्या बाजूने फिरली. विधानसभेच्या २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत शिंदे यांना ४६ हजार, २१ हजार मते मिळाली होती.    

पाटील यांना अपेक्षित मतांची आघाडी मिळाली नाही. त्यामुळे शिंदेंच्या मुसंडीने विजयानंतरही भाजप नगरसेवक-पदाधिकारी धास्तावले आहेत. या मतदारसंघात दीड डझन नगरसेवकांकडून प्रदेशाध्यक्षांचा म्हणावा तसा ‘पाहुणचार’ झाला नाही. त्यामुळे भाजपमधील ‘हिशेबी’ राजकारणाचा फटका कोणाला बसणार? याचा निकाल लागण्याची चिन्हे आहेत. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे दीपक शामदिरे यांना दोन हजार ४२८ मते मिळाली.

कोथरूडकरांनी मोठी जबाबदारी दिली आहे. ती योग्यरीत्या पार पाडताना कोथरूडसह संपूर्ण पुण्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. पुणेकरांचे सर्व प्रश्‍न प्राधान्याने सोडविले जातील. मला मिळालेल्या मतांचा आदर करतो.
- चंद्रकांत पाटील, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp-candidate-chandrakant-patil-won-kothrud-vidhansabha-constituency