एकनाथ खडसेंबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात, 'रात गई बात गई'

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 24 October 2020

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे.

पुणे- भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "ईडीची भीती दाखविता का, तुमची सीडी बाहेर काढतो', दिलेल्या या आव्हानावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केवळ "रात गई बात गई', असे म्हणत संबंधित प्रश्नांना उत्तरे देण्याचे शनिवारी सकाळी टाळले. 

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे. या प्रवेशापूर्वी दोन दिवस अगोदर पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार नाहीत, सगळ्यांचा हिरमोड होईल, असे वक्तव्य केले होते. तसेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर खडसे यांनी "मला ईडीची भीती दाखविता का, तुमची सीडी बाहेर काढतो' असे फडणवीस यांच्याबाबत म्हटले होते. केंद्रातील सत्तेचा वापर करून भाजप अंमलबजावणी संचलनालयाच्या (एनफोर्समेंट डिरेक्‍टोरेट-ईडी) चौकशीचा ससेमिरा खडसे यांच्यामागे लावेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावर खडसे यांनी माझ्याकडे सीडी आहे, ती बाहेर काढतो, असे आव्हान फडणवीस यांना दिले आहे.

'ज्यांच्या जावयाने शेतकऱ्यांची जमीन खाल्ली ते दुसऱ्यांच्या जमिनी काय...

पाटील शनिवारी सकाळी पुणे महापालिकेच्या आवारात पाच रुपयांत पाच किलोमीटर बससेवेचे उद्‌घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांनी खडसेंबाबत "ईडी-सीडी'बाबत त्यांना विचारणा केली तसेच "सगळ्यांचा हिरमोड झाला नाही, उलट भाजपला धक्का बसला' असेही त्यांना विचारले. त्यावेळी पाटील यांनी केवळ "रात गई, बात गई' एवढेच वक्तव्य केले. खडसे यांच्या पक्षांतरावर जास्त टिप्पण्णी करून किंवा प्रतिक्रिया व्यक्त करून त्या विषयाला फारसे महत्त्व द्यायचे नाही, अशी भाजपची रणनिती ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार पाटील यांनी खडसे यांच्याबाबत अधिकची प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले आहे. खडसे यांच्यासमवेत काही प्रमुख माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही पक्षांतर केले आहे, असे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे टाळले.

खडसे यांच्यापाठोपाठ भाजपचे काही पदाधिकारी, विद्यमान आमदार, माजी आमदारही राष्ट्रवादीकडे जातील, असा राजकीय वर्तुळात कयास आहे. मात्र, विद्यमान आमदारांपैकी कोणीही खडसे यांच्यामागे जाऊ नये, यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली आहे. तसेच खडसे यांच्या संपर्कात असलेल्या आमदारांवरही पक्षाने "लक्ष' ठेवण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तरीही आगामी काळात या बाबत काय हालचाली होतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp chandrakant patil comment on eknath khadse