Chandrakant Patil : शरद पवार बोलतात एक अन् अर्थ निघतो दुसरा; चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp Chandrakant Patil criticize ncp Sharad Pawar speaks one thing and means another politics pune

Chandrakant Patil : शरद पवार बोलतात एक अन् अर्थ निघतो दुसरा; चंद्रकांत पाटील

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहाटेच्या शपतविधीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना ‘‘शरद पवार काय बोलतात आणि त्याचा अर्थ काय हे?

समजणारा माणूस अजून महाराष्ट्रात जन्माला यायचा आहे. ते बोलतात एक आणि त्याचा अर्थ दुसरा निघतो, त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे हे घाईचे होईल, असे सांगत त्यावर थेट भाष्य टाळले. तर, कसबा पोटनिवडणुकीत ५० हजार मतांनी भाजपचा विजय होईल, असा दावा पाटील यांनी केला.

कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारक येथून दुचाकी फेरी काढण्यात आली, त्याचा समारोप अप्पा बळवंत चौकाजवळ झाला. यानंतर पाटील यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पवार यांच्याबद्दल हे मत व्यक्त केले.

कसबा पोट निवडणुकीबाबत बोलताना म्हणाले, निवडणूक ही शेवटच्या चार रंगते,भाजपने गेल्या १०-१२ दिवसात घरोघरी प्रचार करून ही निवडणूक खूप पुढे नेऊन ठेवली आहे. हे आजच्या रॅलीवरून दिसून येते. ही निवडणूक खूप सोपी आणि एकतर्फी आहे, पण आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतो. त्यामुळे ५० हजार मतांचे मताधिक्य आम्हाला मिळेल. जे आत्तापर्यंतचे सर्वाधिक असेल.

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त निधी मिळतो, त्यामुळे १७४ आमदार सत्तेत असताना त्या पक्षाचा आमदार निवडून दिला निधीसाठी आग्रह धरता येतो. त्यामुळे कसब्यातून भाजपचा उमेदवार निवडून आला तर त्याला जास्त निधी मिळेल. यामध्ये दुसरा कोणताही अर्थ नाही.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेतला पाहिजे, तशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. शिवसेनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यामुळे यावर मी बोलणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.