
पुणे : बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे, पण हे काम सुरू असताना नाटकांसाठी इतरत्र जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे, त्यासाठी खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास प्रकल्पाचा चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. १९) आढावा घेतला. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, आशुतोष वैशंपायन यासह चित्रपट आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, बालगंधर्वच्या पुनर्विकासाच्या दोन वर्षांच्या कालावधीत नाट्यरसिकांना आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कलाकारांना, नाट्यगृहापासून वंचित राहावे लागणार असल्याची भीती आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील इतर खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून, यावर तोडगा काढावा. किमान पुनर्विकासाचे काम पूर्ण होईपर्यंत अत्यल्प दरात महापालिकेसह खासगी नाट्यगृहे नाट्यरसिकांसाठी उपलब्ध करून द्यावीत. बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार असल्यामुळे, पुणे शहराच्या सौंदर्यात भरच पडणार आहे. पुनर्विकास होताना जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.