Pune News : पुण्यातून टिळेकर, गोरखे विधानपरिषदेवर

भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर व भाजपचे पिंपरी विधानसभाप्रमुख अमित गोरखे यांना संधी दिली आहे. गोरखे हे मातंग समाजाचे भाजपकडून एकमेव उमेदवार आहेत.
Pune News
Pune Newssakal
Updated on

पिंपरी/पुणे : भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर व भाजपचे पिंपरी विधानसभाप्रमुख अमित गोरखे यांना संधी दिली आहे. गोरखे हे मातंग समाजाचे भाजपकडून एकमेव उमेदवार आहेत. त्यांनी अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपदही भूषविले आहे; तर टिळेकर हे भाजपच्या इतरमागासवर्गीय (ओबीसी) विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष व माळी समाजाचे आहेत.

पिंपरी व हडपसर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. हडपसरचे दावेदार आणि माजी आमदार टिळेकर व पिंपरीचे दावेदार अमित गोरखे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर टक्केवारीत जादा असलेल्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) व अनुसूचित जातीच्या (एससी) मतदारांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत ‘सकाळ’ने यापूर्वी दिलेली बातमी खरी ठरली आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विद्यमान आमदार आहेत. भाजपचे योगेश टिळेकर मागील २०१९च्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार ८२० मतांनी पराभूत झाले होते. टिळेकर २०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. टिळेकर यांचा प्रवास नगरसेवक ते आमदार असा आहे. त्यांनी ‘भाजयुमो’चे प्रदेशाध्यक्ष पदही भूषविले आहे. यावेळी ते हडपसरमधून प्रबळ दावेदार होते.

याशिवाय शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे देखील इच्छुक आहेत. तशीच परिस्थिती पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहे. विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. भाजपकडून गोरखे इच्छुक होते; तर महायुतीत मागील वेळी ही जागा मित्रपक्ष ‘आरपीआय’ (आठवले) यांना सुटलेली आहे. ‘आरपीआय’च्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे २०१४ मध्ये तीन हजार ८०८ मतांनी पराभूत झाल्या होत्या. यावेळीही त्या दावेदार आहेत. महायुतीने एकत्र निवडणूक लढविल्यास गोरखे यांना संधी मिळणार नाही. त्यामुळे महायुतीतून एकत्र लढल्यास भाजपने या दोन्ही मतदारसंघात आपला दावा आजच मागे घेतला, असे चित्र आहे. टिळेकर व गोरखे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

मुळीक काय करणार?

महायुती टिकविण्यासाठी योगेश टिळेकर व अमित गोरखे यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. परंतु पुण्यात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार आहेत. भाजपचे माजी पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक २०१४ मध्ये येथे आमदार होते. २०१९च्या निवडणुकीमध्ये मुळीक यांचा चार हजार ९७५ मतांनी पराभव झाला होता, ते २०२४ साठी तयारी करत आहेत. असे असताना मुळीक यांचा विचार विधान परिषदेसाठी करण्यात आला नाही. त्यामुळे आगामी काळात मुळीक निवडणूक लढविणार की शांत बसणार? याकडे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.