Vidhan Sabha 2019 : शिवाजीनगरमध्ये गटबाजीमुळे भाजपचीच परीक्षा! 

मंगेश कोळपकर
Wednesday, 2 October 2019

काँग्रेसमध्ये मनीष आनंद यांनी गेल्या 2 वर्षांपासून विधानसभेची तयारी सुरू केली होती. मात्र बहिरट यांनीही नेटाने प्रयत्न केले. जातीय समीकरणे बहिरट यांना अनुकूल ठरली आणि उमेदवारी मिळविण्यात त्यांना यश आले. काँग्रेसचा पारंपरिक मतदार येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या पर्यंत पोचण्यात बहिरट यांना यश येते का, या बद्दल कुतूहल आहे. 

पुणे : काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांची तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुहास निम्हण यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर झाली. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाकडून सिद्धार्थ शिरोळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. 

या मतदारसंघात 3 लाख 4 हजार 910 मतदार आहेत. यापूर्वी 1999 आणि 2004 मध्ये येथून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र 2014 मध्ये माजी नगरसेवक विजय काळे यांना भाजपने उमेदवारी दिली आणि ते विजयीही झाले. पण त्या नंतर या मतदारसंघातील गणिते बदलली. भाजपच्या इच्छुकांची संख्या येथे मोठी होती. तब्बल 30 जणांनी येथून मुलाखत दिली होती. विद्यमान आमदार काळे आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांना त्यांचा विरोध आहे. कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, असा त्यांचा आग्रह होता. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपने अनिल शिरोळे यांचे तिकीट कापले. तेव्हाच सिध्दार्थ यांना विधानसभेचा शब्द दिला होता, असे सांगण्यात येत आहे. 

काँग्रेसमध्ये मनीष आनंद यांनी गेल्या 2 वर्षांपासून विधानसभेची तयारी सुरू केली होती. मात्र बहिरट यांनीही नेटाने प्रयत्न केले. जातीय समीकरणे बहिरट यांना अनुकूल ठरली आणि उमेदवारी मिळविण्यात त्यांना यश आले. काँग्रेसचा पारंपरिक मतदार येथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या पर्यंत पोचण्यात बहिरट यांना यश येते का, या बद्दल कुतूहल आहे. 

मनसेचे निम्हण यांचा पाषाण परिसरात संपर्क आहे. नागरी सुविधांसाठी सतत सक्रीय असल्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत मिळेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

या मतदारसंघात भाजपचे 12 नगरसेवक आहेत. पक्षाला मानणारा वर्ग देखील मोठा आहे. मात्र स्थानिक गटबाजी दूर करून नाराज घटकांना प्रचारात सहभागी करून घेण्याचे आव्हान शिरोळे यांच्या पुढे असेल. घराणेशाहीचा आरोप होत असताना शिरोळे कशी पावले उचलणार आणि त्यांना कशी साथ मिळेल, या कडे पक्षाचे लक्ष असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP internal dispute in Shivajinagar constituency for Maharashtra Vidhan Sabha 2019