भाजपवासीय नेते भेटले काँग्रेस आमदारांना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

दोन्ही बाजूंनी आगपाखड
काँग्रेसच्या एका नगरसेविकेच्या पतीने, तर एका नगरसेवकाच्या भावाने ऐन निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला अल्प मतांनी पराभव पत्करावा लागला. त्याचा राग मनात धरून पराभूत झालेल्या या उमेदवार नेत्याने काँग्रेसच्या बैठकांना, कार्यक्रमांना या दोन्ही नगरसेवकांना आमंत्रित का केले, यावरून नाराजी व्यक्त केली. सोमवारी आघाडीची एक बैठक झाली. मात्र, या बैठकीला या दोघा नगरसेवकांना आमंत्रित केले नाही. त्यामुळे वैतागलेल्या त्यापैकी एकाने पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

पुणे - विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने चर्चेचा विषय झाला होता. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर त्यापैकी काहींनी पुन्हा काँग्रेसच्या आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या या भेटीने शहर काँग्रेसमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भाजपवासीय झालेल्या या नेत्यांनी केवळ अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतली की अन्य कारणांसाठी, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.

आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या वाट्याला तीन मतदारसंघ आले होते. त्यापैकी पुणे कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघातील पक्षाचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवाराला थोड्या मतांनी पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे विजयी आणि पराभूत, अशा दोन्ही उमेदवारांकडून निकालानंतर विश्‍लेषण करताना पक्षबदल करण्याचा फायदा आणि तोट्यावर चर्चादेखील झाली.

निकाल लागल्यानंतर भाजपवासीय झालेल्या काही माजी नगरसेवकांनी आमदार विश्‍वजित कदम आणि आमदार संग्राम थोपटे यांची स्वतंत्र भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसवर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, भेट घेणाऱ्यांमध्ये शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपवासीय झालेले काही जण होते. निवडून आल्याबदल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात या भेटीत काय चर्चा झाली, यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र, निवडणुकीत ऐन वेळी पक्षबदल करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leader Congress MLA Meet Politics