पुण्यात अंदाज चुकल्याने भाजपचा दोन जागांवर झाला पराभव 

मंगेश कोळपकर  
Monday, 28 October 2019

"एसआयडी'तील या अधिकाऱ्यावर विश्‍वास असल्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या अपडेट्‌समुळे मुख्यमंत्री निर्धास्त राहिले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पुणे- राज्य सरकारचे कान आणि डोळे समजल्या जाणाऱ्या राज्य गुप्तवार्ता विभागातील (एसआयडी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा अंदाज चुकला अन्‌ भारतीय जनता पक्ष पुण्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गाफील राहिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. 

पुण्यात नियुक्तीवर असताना संबंधित अधिकाऱ्याने महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांचे "तंतोतंत' पालन केले होते. विधानसभा निवडणूक असल्यामुळे त्याचे इतर भागासह पुण्यावर विशेष लक्ष होते. निवडणूकपूर्व उमेदवारी जाहीर झाल्यावर आणि प्रचारादरम्यान पुणे शहरातील राजकीय वातावरणाचे "करंट अपडेट्‌स' त्यांनी मुंबईत शेअर केले होते. सभा, पत्रकार परिषदा, मेळाव्यांसाठी उपस्थित राहणाऱ्या पोलिसांकडून मिळणारे अपडेट्‌स लगेचच "पुढे' पाठविले जात होते. पुण्यातील आठही जागा येतील, असाच रिपोर्टचा सूर कायम होता. फक्त हडपसरमध्ये विशेष प्रयत्न करावे लागतील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते. त्यामुळे काही उमेदवारांच्या बोलण्यात "एसआयडी'च्या यादीत आमचे नाव विजयी होणार म्हणून आहे, असे आले होते. 

"एसआयडी'तील या अधिकाऱ्यावर विश्‍वास असल्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या अपडेट्‌समुळे मुख्यमंत्री निर्धास्त राहिले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रत्यक्षात फक्त पर्वती, कसबा आणि कोथरूड या मतदारसंघांत 20 हजारांपेक्षा जास्त मताधिक्‍य मिळाले. खडकवासल्यात अवघे 2500, तर कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरमध्ये जेमतेम 5 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. 

"वडगाव शेरी'मध्येही वेगळेच घडले 
"एसआयडी'ने हडपसर, कॅंटोन्मेंटवर लक्ष देण्यास सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात वडगाव शेरीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार पराभूत झाले आणि राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे विजयी झाले. शहरात भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला वडगाव शेरीबद्दल संशय नव्हता. मात्र, पुणे शहर पोलिसांच्या विशेष शाखेने हडपसर आणि वडगाव शेरी "डेंजर झोन'मध्ये असल्याची जाणीव वरिष्ठ अधिकाऱ्यांना करून दिली होती, असेही आता चर्चेत बाहेर येऊ लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP lost two seats due to inaccurate estimates in pune