कुलर, पंखे, पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटेही

कुलर, पंखे, पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटेही
Published on

PNE26W15482
सोलापूर ः सभेच्या ठिकाणी नागरिकांच गैरसोय न होण्यासाठी पाण्याच्या बाटल्या, जार व कुलर.

१०० कुलर, तेवढेच पंखे, १० हजार पाण्याच्या बाटल्या अन्‌ बिस्किटेही
रणरणत्या उन्हात भाजपकडून महिला, मुलांसह नागरिकांची विशेष काळजी

सोलापूर, ता. २८ : १०० हून अधिक कुलर, तेवढेच पंखे, १० हजार पाण्याच्या बाटल्या, थंड पाण्याचे जार आणि बिस्किटांचे पुडे... असे चित्र भाजपच्या विजयी मेळाव्यात पाहायला मिळाले. ४३ अंश सेल्सिअस तापमानात दुपारी १२ ते २ या वेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर उभारलेल्या शामियानात जमलेल्या पाच हजारांहून अधिक महिला, मुले, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेतल्याचे दिसून आले.

भाजपच्या वतीने महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका सदस्यांच्या सत्कारासाठी विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती.

प्रत्येक खुर्चीवर शेला आणि पाण्याची बाटली
दोन्ही मंडपांमध्ये १०० कुलर आणि तेवढ्याच पंख्यांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक खुर्चीवर आधीपासून पाण्याची बाटली ठेवण्यात आली होती. याशिवाय बिस्किटांच्या पुड्यांचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. विशेषतः महिला, पुरुष आणि लहान मुलांची काळजी घेतल्याचे दिसून आले.

महिलांनी टोप्याऐवजी स्कार्फचा आधार
मुख्यमंत्री येण्यापूर्वीच दोन्ही मंडप गर्दीने खचाखच भरले होते. सभेस येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेशद्वारावर शेला आणि टोपी देण्यात आली. मात्र, अनेक महिलांनी उन्हापासून बचावासाठी चेहरा स्कार्फने पूर्ण झाकून घेतला होता. काही महिला सावलीच्या शोधात दिसून आल्या, तर अनेकांनी झाडांच्या सावलीत थांबणे पसंत केले.

फडणवीसांची सेल्फी, सदस्यांची स्माईल
सत्कार सोहळा संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य मंडपाशेजारी असलेल्या जिल्हा परिषद व महापालिका सदस्यांच्या व्यासपीठावर भेट दिली. यावेळी महिला सदस्यांनी सेल्फीची विनंती करताच फडणवीस यांनी तत्काळ मोबाईल हातात घेत सर्वांसोबत सेल्फी काढली.

हायटेक यंत्रणा, अचूक नियोजन
मेळाव्यासाठी हायटेक यंत्रणा वापरून अचूक नियोजन करण्यात आले होते. मुख्य व्यासपीठावर प्रथमच नवीन पद्धतीच्या खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मुख्य बॅनर एलईडी स्वरूपात लावण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि ‘विश्वास जनतेचा, विजयोत्सव भाजपचा’ अशी घोषवाक्ये झळकत होती. दोन्ही बाजूंना मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि प्रमुख नेत्यांच्या छायाचित्रांनी सजविलेला एलईडी बॅनर विशेष आकर्षण ठरत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com