रोपळे जि.प. गटात भाजपाच्या ताई वनसाळे विरुद्ध राष्ट्रवादीच्या गीतांजली साळुंखे यांच्यात थेट लढत - -

रोपळे जि.प. गटात भाजपाच्या ताई वनसाळे विरुद्ध राष्ट्रवादीच्या गीतांजली साळुंखे यांच्यात थेट लढत - -

Published on

लोगो : रोपळे जि.प. गट
---
भाजपच्या वनसाळे विरुद्ध राष्ट्रवादीच्या साळुंखे
महिला उमेदवारांमध्ये थेट लढत; अंतिम टप्प्यात तापले राजकीय वातावरण
मोहन काळे : सकाळ वृत्तसेवा
रोपळे बुद्रूक, ता. ३ : रोपळे (ता. पंढरपूर) परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरवातीला बहुपदरी वाटणारी ही लढत आता भाजपच्या ताई वामन वनसाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीतांजली हनमंत साळुंखे यांच्यात थेट संघर्षात रूपांतरित झाली आहे.
दोन्ही महिला उमेदवारांनी प्रचारात जोर वाढवला असून घराघरांत संपर्क, महिला मेळावे, युवकांशी संवाद तसेच स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचारावर भर दिला जात आहे. निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंनी आपली भूमिका ठामपणे मांडली जात असून, रोपळे जि. प. गटातील लढत अत्यंत चुरशीची ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या ताई वनसाळे या पक्षाची संघटनात्मक ताकद, मजबूत यंत्रणा आणि विकासाचा अजेंडा पुढे ठेवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीतांजली साळुंखे या स्थानिक संपर्क, सामाजिक सहभाग आणि महिलांच्या प्रश्नांवर आधारित विकासाचा मुद्दा पुढे करत आपली बाजू भक्कम करत आहेत.

पक्षांतरामुळे नाराजी, मतांचे ध्रुवीकरण
दरम्यान, निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही स्थानिक नेत्यांनी केलेल्या पक्षांतरामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या नाराजीचा नेमका फटका कोणाला बसेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक असली तरी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतांचे ध्रुवीकरण मोठ्या पक्षांकडे झुकताना दिसत आहे. त्यामुळे रोपळे जि. प. गटाची निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत ठरणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
---
महिला नेतृत्व की पक्षनिष्ठा?
अखेर मतदार महिला नेतृत्वाला संधी देताना केवळ पक्ष पाहणार की उमेदवाराचा चेहरा आणि कामाची दिशा पाहणार, यावरच या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.
---
रोपळे पंचायत समिती गणातही चुरस
रोपळे गण सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित असून, या गणात भाजपच्या उषा अशोक शेडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजया विलास भोसले यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. या गणाच्या निकालाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com