मुख्यमंत्री ठाकरेंवर भाजप अशाप्रकारे साधणार निशाणा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

- उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यासाठी भाजप शुक्रवारी असा घालणार घाट  

- मेरा अंगण, मेरा रणांगण, प्रत्येक शहरात होणार

पुणे : उद्धव ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी 'मेरा अंगण मेरा रणांगण,' हे भारतीय जनता पक्षाचे आंदोलन शुक्रवारी सकाळी राज्यातील प्रत्येक शहरात होणार आहे. कार्यकर्त्यांनी काळ्या कपड्यात घराच्या दारात हे आंदोलन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने या आंदोलनावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकारला अपयश आले आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. त्याचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजपने 'मेरा अंगण, मेरा रणांगण' हे आंदोलन शुक्रवारी सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान करण्याचा आदेश दिला आहे. तर, पुण्यामध्ये हे आंदोलन सकाळी दहा ते साडेदहा दरम्यान होईल, असे भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले. या आंदोलनाच्या तयारीसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी बुधवारी सायंकाळी पदाधिकारी, नगरसेवक यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली तर, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांसाठी झूम कॉलद्वारे बैठक घेतली, असेही त्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्धवा अजब तुझे नि्ष्फळ सरकार, अशा निषेधांच्या घोषणांचे फलक तयार करा. अंगावर काळे कपडे परिधान करा, मग डोक्यावर काळी रिबीन बांधा, घरातील सदस्यांसह घरांच्या अंगणात किंवा व्हरांड्यात एकत्र या, नि आंदोलनाचे फोटो काढून प्रिंट आणि इलेट्रॉनिक मिडीयाला पाठवा, त्यांना बोलवा, आंदोलनाचे फोटो सोशल मिडियावर शेअर करा आदी विविध सूचना चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी थाळीनाद करण्याचे तसेच वीज पुरवठा काहीवेळ खंडित करण्याचे आवाहन केले होते. त्या धर्तीवर प्रदेश भाजपने हे आंदोलन हाती घेतले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यासाठी पाटील यांनी काही घोषणाही सुचविल्या आहेत. उदा - कोरोनाच्या संकटाला जबाबदार, ठाकरे सरकारचा भोंगळ कारभार, उद्धव भाषण ठोकतो डरोना-डरोना, पण रोखता येईना कोरोना-कोरोना, आदी घोषणांचा त्यात समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपच्या या आंदोलनाच्या तयारीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी शेलक्या भाषेत समाचार घेतला आहे. दो गज की दुरी, सत्ता की लालच बुरी, असे म्हणत त्यांनी भाजपवर कोरडे ओढले आहेत. कपडे कसे घालावेत, यापेक्षा कार्यकर्त्यांना महाराष्ट्र धर्म पाळण्याचे आदेश भाजपने द्यायला हवे, असेही पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी या आंदोलनाची खिल्ली उढविली असून, हा प्रकार हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will criticize on CM Uddhav Thackeray Government