

भाजप महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीला स्थगिती
जंबो कार्यकारिणीवर केंद्रीय नेतृत्वाचा आक्षेप; जिल्हानिहाय महिला प्रभारींची होणार नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ८ ः भाजप महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीला केंद्रीय नेतृत्वाने स्थगिती दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी २३ जुलै रोजी जाहीर केलेल्या ९८ सदस्यांच्या कार्यकारिणीवर केंद्रीय नेतृत्वाने आक्षेप घेतला असून, आता नव्याने कार्यकारिणीची पुनर्रचना केली जाणार आहे. दरम्यान, संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हानिहाय महिला प्रभारींची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी २३ जुलै रोजी महिला आघाडीची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यामध्ये २७ उपाध्यक्ष, आठ सरचिटणीस, ५५ सचिव, एक कोषाध्यक्ष आणि सात कार्यकारिणी सदस्यांचा समावेश होता. मात्र, केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार तीन दिवसांपूर्वी ही कार्यकारिणी स्थगित करण्यात आली. स्वतः वाघ यांनीच याबाबत माहिती देत केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार कार्यकारिणीला स्थगिती दिल्याचे स्पष्ट केले.
ही कार्यकारिणी ‘जंबो’ असल्याचा आक्षेप केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वीच्या नेतृत्वाच्या सूचनेनुसारही मोठी कार्यकारिणी करण्यात आली होती. त्यामुळे यावेळीही मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रदेश भाजपच्या कार्यकारिणीत ४३ पदाधिकारी असताना महिला आघाडीच्या कार्यकारिणीत कार्यकारिणी सदस्य वगळता पदाधिकाऱ्यांची संख्या त्यापेक्षा अधिक होती. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने या कार्यकारिणीला स्थगिती दिल्याची चर्चा आहे.
तीन दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीनंतरच वाघ यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार महिला आघाडीची प्रदेश कार्यकारिणी स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले. या बैठकीत चव्हाण यांनी कार्यकारिणीला स्थगिती देण्यामागील केंद्रीय नेतृत्वाची भूमिका तसेच नव्या कार्यकारिणीच्या रचनेबाबत मार्गदर्शन केल्याचे सांगितले जात आहे.
---
चौकट
२०२९ च्या दृष्टीने पुनर्रचना
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यासंदर्भातील विधेयकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून २०२९ च्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांसाठी महिला नेतृत्वाला अधिक संधी देण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही विधेयके मंजूर झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महिला नेतृत्वाची फळी तयार करण्याच्या दृष्टीने महिला आघाडीची पुनर्रचना केली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
लवकरच जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या
शनिवारी (ता. ८) मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महिला आघाडीची बैठक झाली. राज्यातील महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष या बैठकीस उपस्थित होत्या. बैठकीत संघटनात्मक कामाचा आढावा घेण्याबरोबरच आगामी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. महिला आघाडीचे काम अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तसेच संघटनात्मक बळकटीकरणासाठी लवकरच जिल्हानिहाय महिला प्रभारींची नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---
कार्यकारिणी स्थगितीमागे तीन प्रमुख उद्दिष्टे
- २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला नेतृत्वाची फळी उभारणे
- जिल्हानिहाय संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे
- महिला मतदारांपर्यंत पक्षाचे संघटन व योजनांचा प्रभावीपणे विस्तार करणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.