
देश वेठीस धरण्यासाठी विरोधकांची धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी!
पुणे - केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेमुळे देशातील राष्ट्रप्रेमी तरुणांना केवळ रोजगाराच्या नव्हे, तर देशसेवेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र, या थेट भरती योजनेमुळे दुकानदारी बंद झाल्याने दुखावलेल्यांना हाताशी धरून राजकीय स्वार्थासाठी देश पेटवायला निघालेल्या विरोधकांना देशातील जनता ओळखून असून ही कारस्थाने यशस्वी होऊ देणार नाही असा विश्वास भाजपच्या प्रवक्त्या व प्रदेश सचिव श्वेता शालिनी यांनी येथे व्यक्त केला.
देशांतर्गत दहशतवाद, नक्षलवादी कारवाया आणि परकी शक्तींनी पुकारलेले छुपे युद्ध अशा अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी तरुणांना सिद्ध करणाऱ्या या योजनेस विरोध करण्याकरिता राजकीय विरोधकांनी देशात तरुणांची माथी भडकावण्याचे काम सुरू केले आहे. केवळ मोदी सरकारच्या एका महत्वाकांक्षी योजनेस अपशकुन करण्यासाठी राजकीय विरोधक बेरोजगारीच्या समस्येचे भांडवल करून निष्पाप तरुणांची माथी भडकावत देशाला वेठीस धरण्यासाठी कोणत्या थराला जातात याचेच हे उदाहरण आहे. तरुणांनी अशा चिथावणीस बळी न पडता या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या उत्कर्षाच्या नव्या संधीचे स्वागत करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
या योजनेमुळे देशाच्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करणे शक्य होणार आहे. सैनिकी प्रशिक्षणाच्या नव्या महत्वाकांक्षी माध्यमातून भारताच्या संपूर्ण संरक्षण सज्जतेमध्ये युवकांचे महत्वाचे योगदान घडविणारी आणि अशा कुशल तरुणांचा एक मोठा समूह तयार करणारी ‘अग्निपथ’ ही योजना म्हणजे एक परिवर्तनकारी पाऊल आहे, अशा शब्दांत शालीनी यांनी अग्निवीर योजनेचे जोरदार समर्थन केले. या योजनेचे लाभार्थी आपले कौशल्य आणि अनुभवाने स्वतःसाठी करियरच्या अनेक अनोख्या संधी निर्माण करून अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावू शकणार आहेत. कारण या योजनेमुळेच तरुणांना सैन्यातील नोकरीबरोबरच, आपल्या भविष्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी गरजेच्या असलेल्या अनेक अतिरिक्त कौशल्यांचे प्रशिक्षणही मिळणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. अग्निपथ योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणामुळे अर्थव्यवस्थेत नव्याने निर्माण होत असलेल्या उद्योजकता आणि नोकऱ्यांच्या अनेक संधींचा पाठपुरावा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे चिथावणीच्या कारस्थानास युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
चार वर्षांच्या सेवाकाळानंतर मुक्त होणाऱ्या तरुणांचे भविष्य असुरक्षित होईल या आक्षेप निरर्थक असून असे प्रशिक्षण घेतलेल्या अग्निवीरांना प्राप्त होणाऱ्या कौशल्यामुळे भविष्यातील संधींचा प्राधान्याने फायदा मिळणार आहे. साधारणपणे तरुणांच्या करियरची सुरवातच वयाच्या २०-२२ व्या वर्षानंतर सुरू होत असते. त्याआधी अग्निवीर म्हणून सेवाकाळ पूर्ण केलेल्या तरुणांच्या हाती भविष्य घडविण्यासाठी किमान ११ लाख रुपयांची पुंजी हातात असेल, शिवाय त्यांना त्यांच्या भविष्यातील स्वप्नांसाठी पॅकेजच्या स्वरूपात अर्थसाह्य मिळणार असल्याने, करियरच्या सुरुवातीचे आर्थिक अडथळे पार झालेले असतील. ज्यांना सेवाकाळात आपले औपचारिक शिक्षण पूर्ण करावयाचे असेल, त्यांना ती संधी मिळणारच आहे. शिवाय, ही सेवा पूर्ण केल्यानंतर संरक्षण यंत्रणांमधील नोकऱ्यांमध्ये त्यांना प्राधान्याने संधी मिळणार आहे, अशी माहिती शालीनी यांनी दिली.
अग्निवीर हे सामाजिक सुरक्षिततेचा धोका ठरेल हा तरुणांच्या राष्ट्रनिष्ठेवर संशय घेणारा निरर्थक आक्षेपही पोटदुखी झालेले विरोधक घेताना दिसतात. कारण या काळात मिळणारे प्रशिक्षण हे देशप्रेमाचे, राष्ट्रनिष्ठेचेच असणार आहे. असा आक्षेप घेणे म्हणजे, सैन्यदलाच्या निष्ठेवरच संशय आणि गैरसमज परसविणे आहे. सैन्यदलातून निवृत्त झालेले हजारो जवान त्यांच्या कौशल्याच्या बळावर आजही देशसेवेसाठी निष्ठेने काम करत असून समाजविघातक कारवाया मोडून काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेच दिसत असताना असा आक्षेप घेणारे विरोधक तरुणांच्या राष्ट्रप्रेमावरच शंका उपस्थित करत आहेत, असेही शालीनी यांनी म्हटले आहे.
Web Title: Bjps State Spokesperson And Secretary Shweta Shalini Accuses The Opposition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..