esakal | Vidhan Sabha 2019 : भाजपची युवा ब्रिगेड बदलणार सत्तासमीकरण 
sakal

बोलून बातमी शोधा

BJP's youth brigade will change power in  Vidhan Sabha 2019

Vidhan Sabha 2019 :  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सर्वात सुरक्षित अशा कोथरूड मतदारसंघात दिलेली उमेदवारी, खासदार गिरीश बापट यांच्या वारसदार म्हणून कसबा पेठेत महापौर मुक्ता टिळक यांची लागलेली वर्णी, लोकसभेची उमेदवारी नाकारल्याच्या बदल्यात शिवाजीनगर मतदारसंघात माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव नगरसेवक सिद्धार्थ यांचे करण्यात आलेले पुर्नवसन, माजीमंत्री दिलीप कांबळे यांना त्यांचेच बंधू स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांचा पुणे कॅन्टोंमेंट मतदारसंघात शोधण्यात आलेला पर्याय अशा महत्त्वपूर्ण घडामोडी आणि उलथापालथी करीत पुण्यात भाजपने आपले उमेदवार जाहीर केले.

Vidhan Sabha 2019 : भाजपची युवा ब्रिगेड बदलणार सत्तासमीकरण 

sakal_logo
By
संभाजी पाटील @psambhajisakal

Vidhan Sabha 2019 : पुणे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सर्वात सुरक्षित अशा कोथरूड मतदारसंघात दिलेली उमेदवारी, खासदार गिरीश बापट यांच्या वारसदार म्हणून कसबा पेठेत महापौर मुक्ता टिळक यांची लागलेली वर्णी, लोकसभेची उमेदवारी नाकारल्याच्या बदल्यात शिवाजीनगर मतदारसंघात माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव नगरसेवक सिद्धार्थ यांचे करण्यात आलेले पुर्नवसन, माजीमंत्री दिलीप कांबळे यांना त्यांचेच बंधू स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांचा पुणे कॅन्टोंमेंट मतदारसंघात शोधण्यात आलेला पर्याय अशा महत्त्वपूर्ण घडामोडी आणि उलथापालथी करीत पुण्यात भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. शहरात आठ मतदारसंघापैकी चार ठिकाणी पक्षाने भाकरी फिरवली. उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यानंतर शहरातील सत्तासमीकरणे मोठ्याप्रमाणावर बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून पुणे शहरात भाजपला सर्वात चांगले वातावरण आहे. पुणेकरांनी भाजपच्या बाजूने गेल्या लोकसभा निवडणुकीपासून कौल देण्यास सुरुवात केली तो अगदी आताच्या लोकसभेपर्यंत तो कायम ठेवला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील आठही जागा, दोन वर्षापूर्वी झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत शंभर जागांसह स्पष्ट बहुमत आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना सव्वा तीन लाखांच्या मताधिक्‍य देऊन पुणे या भाजपच्या बालेकिल्ल्यास बळकटी मिळवून दिली. लोकसभा निवडणुकीत शहरातील आठही विधानसभा निवडणुकीत भाजपला घसघशीत मताधिक्‍य मिळाले होते. त्यामुळे भाजप पुण्यात काही वेगळा प्रयोग विधानसभेत करणार हे स्पष्ट होते. त्यानुसार तीन विद्यमान आमदारांना सुट्टी देण्यात आली आणि तेथे नवे चेहरे देण्यात आले. हे उमेदवार देताना कोथरूडचा अपवाद वगळता इतर ठिकाणी युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. 

 Vidhan Sabha 2019 : शिवाजीनगरमध्ये परतफेड 
शिवाजीनगर मतदारसंघात आमदार विजय काळे यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांना संधी देण्यात आली आहे. 2014 च्या निवडणुकीच्यावेळीच सिद्धार्थ यांचे नाव शिवाजीनगरमध्ये आघाडीवर होते. पण घराणेशाहीचा आक्षेप इतर इच्छुकांनी घेतल्याने ऐनवेळी काळे यांना संधी देण्यात आली होती. लोकसभेची उमेदवारी देताना अनिल शिरोळे यांना वगळण्यात आले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी सिद्धार्थ यांना शिवाजीनगर मधून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. तो प्रत्यक्षात आणला. यावेळी शिवाजीनगर मध्ये सर्वाधिक 32 जण इच्छुक होते. शिरोळे हे पीएमपीचे संचालक असून, भाजपच्या इतर उमेदवारांमध्ये ते सर्वात तरुण उमेदवार आहेत. 

Vidhan Sabha 2019 : हेची फळ मम तपाला... 
कोथरूड हा भाजपचा सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे एक लाखाचे मताधिक्‍य मिळाले होते. हे मताधिक्‍यच वरिष्ठांच्या नजरेत भरले आणि सहजासहजी विजयी होता येईल असा मतदारसंघ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांनी निवडला. त्यामुळे आमदार मेधा कुलकर्णी आणि नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांची संधी हुकली. या ठिकाणी उमेदवारीसाठी या दोघांनीही खूप कष्ट घेतले होते. पण त्यांचा घास पक्षश्रेष्ठींनी हिरावून घेतला. आता मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांना कशी भरपाई मिळणार हा उत्सुकतेचा विषय आहे. 

पुणे कॅन्टोंमेंटमध्ये आमदार दिलीप कांबळे यांचे राज्यमंत्रिपद काही महिन्यांपूर्वीच काढून घेण्यात आले. त्याचवेळी त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या मतदारसंघातही भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी होती. या मतदारसंघात मातंग समाजाचे असणारे वर्चस्व लक्षात घेऊन तसेच दिलीप कांबळे यांना फारसे न दुखावता सुनील कांबळे हा पर्याय निवडण्यात आला. सुनील हे सध्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा सामना आता माजी मंत्री रमेश बागवे यांच्याशी होईल. पुण्यातील लक्षवेधी लढतीमधील एक लढत म्हणून या लढतीकडे लक्ष राहील. 

वारसदार ठरला 
पुण्यात सर्वाधिक लक्ष लागले होते ते खासदार बापट आपला वारसदार कोणाला नेमणार याकडे. कसब्यातून इच्छुकांची संख्या मोठी होती. पण महापौर मुक्ता टिळक यांचे नाव पहिल्यापासून आघाडीवर होते. स्वरदा बापट, नगरसेवक हेमंत रासने, नगरसेवक गणेश बिडकर असे प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले. पण टिळक यात यशस्वी ठरल्या. बापट नसताना कसब्यात पहिल्यांदाच निवडणूक होत आहे, त्यामुळे विरोधकांनाही बळ आले आहे. काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकर, अरविंद शिंदे यापैकी कोण तिकीट आणण्यात यशस्वी होणार या विषयी उत्सुकता आहे. टिळक यांच्या उमेदवारीने कसब्यातील भाजपच्या राजकारणात बरेच बदल होणार हे नक्की. 

Vidhan Sabha 2019 : उत्सुकता विरोधी उमेदवारांकडे 
पर्वतीमध्ये आमदार माधुरी मिसाळ यांना पक्षांतर्गत फारसा विरोध नव्हता. सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्याशिवाय तेथे फारसा प्रबळ उमेदवार नसल्याने मिसाळ सलग तिसऱ्यांदा याठिकाणाहून लढणार आहे. भाजपने या मतदारसंघाची मजबूत बांधणी केली आहे. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस कसा सामना देणार हे महत्त्वाचे ठरेल. वडगावशेरी हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मात्र या मतदारसंघाचे स्वरूप बदलले. 2014 मध्ये पाच हजारांच्या फरकाने भाजपचा विजय झाला होता. पण पाच वर्षात भाजपचा सुरक्षित मतदार अशी ओळख निर्माण करण्यात या पक्षाला यश आले. हडपसर मतदारसंघात उमेदवार बदलला जाणार अशी चर्चा होती, पण ती फेटाळून लावण्यात आमदार योगेश टिळेकर यांना यश आले. खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर अपेक्षेप्रमाणे उमेदवार ठरले. खडकवासला मतदारसंघात भाजपने लोकसभा निवडणुकीत चांगले मताधिक्‍य दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस याठिकाणी युवा चेहऱ्याला संधी देण्याची शक्‍यता आहे. 
चंद्रकांत पाटील पुण्यात आल्याने सहाजिकच शहर आणि जिल्ह्याचे नेतृत्व त्यांच्याकडेच जाणार आहे. त्यामुळे गिरीश बापट ते चंद्रकांत पाटील असा नेतृत्वाचा प्रवास राहणार असून, शहराची सत्तासमीकरणे या निवडणुकीनंतर पूर्णपणे बदलणार हे नक्की! 

Vidhan Sabha 2019 : युवकांना संधी 
सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, सुनील कांबळे अशी यंग ब्रिगेड भाजपने मैदानात आणली आहे. त्यासोबत आठपैकी दोन ठिकाणी महिला उमेदवार देऊन भाजपने आपली परंपरा जपली आहे. या सर्वांना आता अनुभवी चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर यांची साथ मिळणार आहे. 

loading image