द्राक्षांत ब्लॅक जंबोला मोठी मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

किलोचा भाव १६० रुपयांपर्यंत
घाऊक बाजारात ब्लॅक जंबोला १००० ते १३०० रुपये (१५ किलो), तर किरकोळ बाजारात किलोला १०० ते १६० रुपये भाव मिळत आहे. सोनाकाला ८०० ते १५०० रुपये (१५ किलो), तर किलोला ८० ते १४० रुपये आणि तासगणेशला ६०० ते १००० रुपये (१५ किलो), तर किलोला ६० ते ८० रुपये मिळत आहे.

मार्केट यार्ड - गुलटेकडी मार्केट यार्डात द्राक्षांचा हंगाम बहरला आहे. उत्तम दर्जा आणि खायला गोड असल्यामुळे सध्या दाखल होत असलेल्या द्राक्षांत ब्लॅक जंबोला मोठी मागणी आहे. येथील फळबाजारात रोज २० ते २५ टन द्राक्षांची आवक होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाजारात बारामती, इंदापूर या भागातून सर्वांत जास्त ब्लॅक जंबो द्राक्षांची आवक होत आहे. नारायणगाव येथूनही काही प्रमाणात आवक सुरू आहे. सोनाका आणि तासगणेश या द्राक्षांची सांगली जिल्ह्यातील तासगाव, मनेराजुरी, कौलापूर, सोनी या भागातून आवक सुरू आहे. सध्या बाजारात रोज ब्लॅक जंबो द्राक्षांची ८ ते १० टन आवक होत आहे. तर सोनाका आणि तासगणेश द्राक्षांची १२ ते १५ टन आवक होत असल्याची माहिती द्राक्षांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.पुणे शहर, उपनगरांसह, महाबळेश्वर, वाई, पाचगणी, लोणावळा, रायगड, रत्नागिरी या भागातून द्राक्षांना मोठी मागणी आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे द्राक्षांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षांची आवक कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी असली तरी भाव स्थिर आहेत.

सद्य:स्थितीत बाजारात द्राक्षे मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. दाखल होणाऱ्या द्राक्षांचा दर्जा उत्तम आहे. तसेच गोडीही आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणी होत आहे. पुढील पंधरा दिवसांत द्राक्षांची मागणी अजून वाढेल.
- अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: black jumbo grapes big demand