‘तीन पैशांचा तमाशा’चा आविष्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पूर्ण अंध असल्याने खूप आव्हाने होती. रंगमंचावर प्रवेश आणि पुन्हा बाहेर जाणे हे फारच अवघड होते. अनेकदा आमच्यावर पडणाऱ्या प्रकाशाची उष्णता, पावलांची मोजणी किंवा सहकलाकारांचा आवाज यांचा आधार घेऊन वावर करावा लागतो.  
- तेजस्विनी भालेकर, अंध कलाकार

पुणे - निसर्गाने अंधत्व देऊन आयुष्यात अंधार लादला असला, तरी इच्छाशक्ती असेल, त्यावर मात करता येते, याचा उत्तम अनुभव म्हणजे अंध कलाकारांनी केलेले ‘तीन पैशांचा तमाशा’... यातून नाटक ही डोळस माणसांची कला आहे, हा समज त्यांनी दूर केलाच आणि स्वत:ला दिसत नसले, तरी डोळस माणसांना व्यावसायिक नाटक पाहिल्याचे समाधानही त्यांनी दिले.

तीन पैशांचा तमाशा हे पु. ल. देशपांडे यांचे गाजलेले नाटक आहे. शोषक आणि शोषित यावर ते एक कालातीत भाष्य आहे. अंध कलाकारांना घेऊन हे नाटक प्रेक्षकांपुढे येणे आणि त्यातील मार्मिक टिप्पणीसह प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणे, ही कठीण गोष्ट... पण या कलाकारांनी ती साध्य करून दाखविली. या नाटकाचा प्रयोग बालगंधर्वमध्ये झाला. कलाकारांचे प्रवेश, अभिनय, नृत्य आणि संवादफेक यांसह व्यावसायिक कलाकारांइतक्‍याच आत्मविश्‍वासाने हे कलाकार आपापल्या भूमिकांमध्ये समरस झाले.

नाटकाचा सूत्रधार सोडला, तर सुमारे २७ दृष्टिक्षीण आणि दृष्टिहीन कलाकारांनी हे नाटक टाळ्या मिळवत आणि हशा पिकवत सादर केले. कलाकार अंध असल्याने ते कशाप्रकारे बसविले या प्रश्‍नांवर दिग्दर्शक स्वागत थोरात म्हणाले, ‘‘प्रवेशापासून ते रंगमाचावरील वावर ही आव्हाने होतीच. पण अंधांच्या नाटकाची वेगळी शैली मी विकसित केली, त्या आधारे नाटक बसविले. बरेच कलाकार हे नोकरी करतात. त्यामुळे केवळ शनिवार, रविवार सरावारासाठी मिळाला. गेले सात-आठ महिने आम्ही तयारी करीत होतो. संवाद ब्रेल आणि ऑडिओ दोन्ही माध्यमांतून त्यांना दिले. या कलाकारांनी स्वत:देखील खूप कष्ट घेतले आहेत.’’

नाटकाच्या निर्मात्या रश्‍मी पांढरे म्हणाल्या, ‘‘धडधाकट माणसांना कुठल्याशा कारणांनी निराशा येते, टोकाचे पाऊल ते उचलतात. पण इथे तर दृष्टीच नाही. पण अदम्य इच्छाशक्ती आहे. अभाव असला, तरी इच्छेच्या बळावर ते काहीही साध्य करता येते, हाच संदेश आम्हाला जगाला द्यायचा आहे.’

Web Title: Blind Actor Drama Tin Paishancha Tamasha