esakal | करा दान; पण हवे भान! जास्त रक्त संकलित केल्यास वाया जाण्याची शक्यता

बोलून बातमी शोधा

Blood Donation
करा दान; पण हवे भान! जास्त रक्त संकलित केल्यास वाया जाण्याची शक्यता
sakal_logo
By
- मंगेश कोळपकर

पुणे - शहरात कामगार दिनानिमित्त एक मे रोजी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा संकल्प विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, उद्योग-कंपन्या यांनी केला आहे. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रक्त संकलित केले, तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. उलट रक्त वाया जाऊ शकते. त्यामुळे नियमितपणे छोटी-छोटी शिबिरे आयोजन करा, असे शहरातील ब्लड बॅंकांनी सांगायला सुरवात केली आहे.

कामगार दिनाच्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी असते. तसेच लसीकरणापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन सोशल मीडियावरूनही होत आहे. त्यामुळे एक मे रोजी रक्तदान शिबिरे आयोजन करण्यासाठी समाजातील अनेक घट पुढे सरसावले आहेत. त्यामुळे आता कोणाला एक मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित करायचे असेल तर, त्यासाठी ब्लड बॅंका उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती उद्‍भवली आहे. तसेच एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यास त्या रक्ताचा फारसा उपयोग होत नाही, असाही अनुभव आहे. त्यामुळे एक मेऐवजी व त्यानंतर दररोज नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे असे बहुसंख्य ब्लड बॅंकांनी सांगायला सुरवात केली आहे.

सगळ्याच ब्लड बॅंकांत रक्ताचा सध्या साठा आहे. छोटी रक्तदान शिबिरे नियमितपणे घेतल्यास त्याचा उपयोग होतो. त्यानुसार आम्ही नियोजन करीत आहोत. एकाच दिवशी अनेक शिबिरे घेऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यानुसारही आम्ही संबंधित संयोजकांना सांगत आहोत.

- डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी

महावीर जयंतीला (२५ एप्रिल) रक्तदान शिबिरे मोठ्या संख्येने झाली होती. आता १ मे रोजीही होत आहेत. रक्ताचा उपयोग होण्यासाठी ९, १६, २३ आणि ३० मे रोजी शिबिरे घेतली तर, त्याचा उपयोग जून आणि जुलै महिन्यात होऊ शकतो. शिबिरांसाठी रक्तपेढ्या सध्या मिळेनाशा झाल्या आहेत.

- राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट

हेही वाचा: 'जम्बो'मध्ये ६० टन प्राणवायूची बचत; छोट्या उपाययोजना ठरल्या फायदेशीर

जून-जुलैत रक्ताचा तुटवडा भासणार

लस घेतल्यावर २८ दिवस रक्तदान करू नये, असा नियम आहे. परदेशात मात्र, लस घेतल्यावर १४ दिवसांनंतर केव्हाही रक्तदान करता येते. एक मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार आहे. प्रत्येकाला दोन डोस घ्यायचे आहेत. त्यामुळे एकूण साठ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे जून-जुलै महिन्यात सगळीकडेच रक्ताचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे आपल्याकडील नियमात बदल करावा, यासाठी केंद्र सरकारच्या ‘नॅशनल ब्लड ट्रान्सफ्यूजन कौन्सिल’ या संस्थेकडे पाठपुरावा सुरू आहे, असे जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी नमूद केले.

ब्लड बॅंकांनी आपल्याकडील रक्ताचा साठा घेऊन रक्तदान शिबिरांची तारीख ठरविणे गरजेचे आहे. एकाच दिवशी रक्तदान शिबिरे मोठ्या संख्येने होणे योग्य नाही. त्यामुळे रक्ताचा उपलब्ध साठा आणि पुढे लागणारी गरज लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे.

- डॉ. शंकर मुगावे, समन्वयक, पुणे विभागीय रक्तपेढी

एकाच दिवशी अनेक शिबिरे घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने शिबिरे घेतली तर त्याचा उपयोग होतो. त्यामुळे रक्ताचा गरजू रुग्णांना उपयोग होतो. त्यामुळे एक मे रोजी एकाच दिवशी मोठ्या संख्येने शिबिरे घेऊ नका, असे आम्ही सांगत आहोत.

- डॉ. स्मिता जोशी, सह्याद्री हॉस्पिटल, रक्तपेढी प्रमुख

अशी असते एक्स्पायरी

  • लाल रक्तपेशी - ४२ दिवस - बाटलीची किंमत १८५० रुपये

  • प्लेटलेट - ५-६ दिवस - किंमत ७५० रुपये

  • प्लाझ्मा - १ वर्ष (प्रमाणित परिस्थितीत) - किंमत ६५० रुपये