esakal | 'जम्बो'मध्ये ६० टन प्राणवायूची बचत; छोट्या उपाययोजना ठरल्या फायदेशीर
sakal

बोलून बातमी शोधा

'जम्बो'मध्ये ६० टन प्राणवायूची बचत; छोट्या उपाययोजना ठरल्या फायदेशीर

'जम्बो'मध्ये ६० टन प्राणवायूची बचत; छोट्या उपाययोजना ठरल्या फायदेशीर

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : ऑक्सिजनची कमतरता जाणवत असताना अनेक रुग्णालयांचाच प्राण कंठाशी येत असताना जम्बो रुग्णालयात छोट्या व साध्या उपाययोजनांमुळे ऑक्सिजनची मोठी बचत झाली आहे. गेल्या १० दिवसात ६० टन पेक्षा जास्त प्राणवायू बचत करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. सध्या रोज १५ ते १६ टन ऑक्सिजन वापरला जात आहे.

पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने गंभीर रुग्णांच्या संख्येत देखील मोठी भर पडली आहे. ऑक्सिजन आणि व्हेटींलेटर बेड मागणीही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. सध्या शहरात ६ हजार ६०० पेक्षा जास्त जणांना ऑक्सिजन बेड तर, १ हजार ३०० पेक्षा जास्त जण व्हेंटीलेटरवर आहेत. ही रुग्ण संख्या वाढल्याने ऑक्सिजनची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महापालिकेची ऑक्सिजनची मागणी प्रत्येक दिवसाला ४० टनाच्या पुढे गेली. तर एकट्या जम्बो रुग्णालयामध्ये १७ एप्रिल रोजी तब्बल २२ टन ऑक्सिजनची आवश्यकता भासली होती. तेव्हा ऑक्सिजन पुरविताना पालिकेची चांगलीच दमछाक झाली होती.

हेही वाचा: 'मोक्का' लागलेल्या दिप्ती काळेची ससूनच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

रुग्णावर उपचार सुरू असताना त्यावर नियंत्रण केले तर ऑक्सिजनची बचत होऊ शकते अशा माहिती टेक्निकल टीमने पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार १८ एप्रिलपासून रुग्ण जेवण करताना, मोबाईलवर बोलताना, स्वच्छता गृहात गेलेला असताना ऑक्सिजनचा वापर होत नाही. त्या कालावधीत कॉक बंद न केल्याने ऑक्सिजचा अपव्यय होत होता. जेव्हा रुग्ण चेहऱ्यावरून ऑक्सिजन मास्क बाजूला काढतो तेव्हा तो लगेच बंद केल्याने बचत होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे रोज २२ टनचा वापर होत असताना सध्या केवळ १५ ते १६ टन ऑक्सिजनचा वापर होत असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.

एका मिनीटासाठी पाच लिटरची ऑक्सिजन

एका ऑक्सिजन बेडवरील रुग्णाला एका मिनिटाला पाच लिटर ऑक्सिजनची गरज पडते. रुग्णांचे दोन वेळेचे जेवण, नाष्टा, स्वच्छता गृहाचा होणारा वापर, फोनवर बोलणे, प्राणायाम अशा प्रकारे साधारणपणे दोन तास ऑक्सिजन वाया जात होते, त्यावर नियंत्रण आणले आहे. त्यातून महापालिकेच्या पैशांचीही बचत झाली आहे.

‘‘ऑक्सिजन बचतीबाबत जम्बो रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्हीवरून देखील नियंत्रण ठेवले जात आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर २२ टनावरून १५ ते १६ टनावर आला आहे.’’

- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

loading image