पुण्यात थरार! नांदेड फाटा येथे रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह

निलेश बोरुडे
Saturday, 17 October 2020

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यातील एका मित्राला ताब्यात घेण्यात आलेले असून दुसरा मित्र चमन बागवान हा तेव्हापासून फरार आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.

किरकटवाडी (पुणे) : सिंहगड रोडवरील नांदेड फाटा (ता. हवेली) येथील मल्हार हॉटेलच्या समोर एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला आहे. यश मिलिंद कांबळे (वय.18, रा.पांडुरंग कृपा, सर्व्हे नं.25, नांदेड,ता.हवेली) असे मृत व्यक्तीचे नाव असून मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पहाटे दोन वाजेच्या दरम्यान सदर घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत यश याला त्याचे दोन मित्र मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान घरी येऊन घेऊन गेले. त्यानंतर यश पुन्हा घरी आला नाही. सकाळी सात वाजेच्या सुमारास शिवसेना खडकवासला विभाग प्रमुख नितीन वाघ यांनी हवेली पोलिस स्टेशनला नांदेड फाट्याजवळ रक्‍तबंबाळ अवस्थेतील तरुण पडलेला असल्याची माहिती फोनवरून दिली. त्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम, पोलीस कॉन्स्टेबल रामदास बाबर, गणेश धनवे, राजेंद्र मुंडे, विश्वास मोरे व होमगार्डचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यातील एका मित्राला ताब्यात घेण्यात आलेले असून दुसरा मित्र चमन बागवान हा तेव्हापासून फरार आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालय येथे पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्याकडून सांगण्यात आले. घटनास्थळी श्वानपथक दाखल झाले असून  घातपाताची शक्यता लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे.

 

दहा हजार कोरोनामुक्त; आठवडाभरातील आकडेवारीने पुणेकरांना दिलासा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of boy was found in front of Nanded Phata Malhar Hotel on Sinhagad Road Pune