कोथरूड - अपंगत्व आले म्हणून रडत बसण्यापेक्षा, आहे त्या परिस्थितीत आपण काय करू शकतो, याचा विचार करून कृती केली की अपंगत्वदेखील आपली प्रगती रोखू शकत नाही. याचे उदाहरण म्हणून सुचित्रा सुनील खरवंडीकर यांच्या जीवनप्रवासाकडे पाहता येईल.
सुचित्रा यांना जन्मतः मॅनिंगो मायोसिल नावाचा दुर्मीळ आजार झाला. या आजारात बाळाच्या शरीरातील नसा जास्त वाढलेल्या असतात. शस्त्रक्रिया करून त्या नसा एक ठिकाणी पाठीवर बांधून ठेवतात. या आजारामुळे त्यांचा उजवा पाय दुबळा झाला. जन्मापासून वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत सतत दवाखाना, औषधी व शस्रक्रिया यामध्ये त्यांचे जीवन व्यतीत झाले. कुटुंबीयांची भक्कम साथ लाभल्याने हा त्रास सहन करण्याची शक्ती मिळाली आणि त्यांनी आवडी-निवडी जोपासत प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली.
सुचित्रा यांना शालेय वयापासूनच कलेची खूप आवड होती. त्यांनी मेहंदी, सिरॅमिक, पॉट पेंटिंग, सॉफ्ट टॉय, म्युरल्स असे अनेक कला प्रकार शिकले. त्यांनी प्रदर्शनात जाऊन मेहंदी काढून देत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि समाजात नावलौकिक मिळविला. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. तेव्हाच त्यांनी कला क्षेत्रात करिअर करायचे ठरविले.
सुचित्रा यांनी ‘आर्ट कॉर्नर’ नावाने २००० मध्ये मेहंदी क्लास सुरू केला. त्यांनी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आपले कौशल्य अजमाविण्याचे ठरविले. त्यांचा पहिला प्रयत्न तांत्रिक कारणामुळे फसला. मात्र त्यांनी हार न मानता १४ ऑक्टोबर २०१८ मध्ये सर्व तयारी करून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’चे अधिकृत परीक्षक बोलाविले.
१८ कलाकारांना सोबत घेऊन सकाळी ९ ते रात्री ९ अशा सलग १२ तासांत एक हजार ६२२ हातांवर मेहंदी काढून भारतातून पहिली ‘मेहंदी मॅरेथॉन विक्रम’ स्थापित केला. त्यानंतर २२ ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यांनी २४ कलाकारांसोबत सलग १२ तासांत दोन हजार ६५२ हातांवर मेहंदी काढून भारतातून आणि आशियातून पहिला आशिया बुक विक्रम स्थापित केला.
सुचित्रा यांनी वयाच्या ४२व्या वर्षी स्पर्धात्मक स्विमिंगमध्ये सहभाग घेतला. स्विमिंगमध्ये राज्य व आंतरराज्य पातळीवर त्यांनी ३५पेक्षा जास्त पदके पटकाविली आहेत. ‘व्हीपीआर मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी ‘मिस इंडिया बेस्ट फ्रेंडली पर्सनालिटी’चा मुकुटही पटकाविला आहे, त्या पुण्यातील पहिल्या महिला व्हीलचेअर ढोल-वादकही आहेत.
आयुष्यात मी कधीही हार मानली नाही. अनेक अडचणी आल्या, मात्र स्वप्नाची पकड कधीच सोडली नाही. माझ्याकडे येणाऱ्या जास्तीत-जास्त मुलींना विविध कला शिकवून त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्याचा माझा प्रयत्न आहे, तसेच स्विमिंगमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्याचे माझे स्वप्न आहे.
- सुचित्रा खरवंडीकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.