धान्यासाठी बोगस दाखले; एजंटांकडून दाखल्यासाठी पाचशे रुपये

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सरकारकडून सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, त्याचा लाभ घेण्यासाठी चक्क बोगस उत्पन्नाचे दाखले काढल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. त्याचा पुरावाही तहसील प्रशासनाच्या हाती लागला आहे. काही एजंट सरकारी यंत्रणेऐवजी आता स्वत:च उत्पन्नाचा बोगस दाखला तयार करून तो पाचशे रुपयांना विकत आहेत. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बोगस दाखले देणाऱ्या एजंटांच्या मोठ्या रॅकेटचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्‍यता आहे.

पुणे - कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात सरकारकडून सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, त्याचा लाभ घेण्यासाठी चक्क बोगस उत्पन्नाचे दाखले काढल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. त्याचा पुरावाही तहसील प्रशासनाच्या हाती लागला आहे. काही एजंट सरकारी यंत्रणेऐवजी आता स्वत:च उत्पन्नाचा बोगस दाखला तयार करून तो पाचशे रुपयांना विकत आहेत. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बोगस दाखले देणाऱ्या एजंटांच्या मोठ्या रॅकेटचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारने लॉकडाउनच्या कालावधीत रेशन कार्डवर सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेतला. ५९ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला असल्यास अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळतो. त्यासाठी काही नागरिक ५९ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला काढण्यासाठी अर्ज करत आहेत. त्यानंतर रेशनकार्डधारकांची संख्या वाढल्याचे दिसून आले. शहरात बोगस उत्पन्नाचे दाखले वितरत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याअनुषंगाने पुणे शहर तहसील कार्यालयाकडून चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीत धनकवडी येथील एका व्यक्‍तीने ५५ हजार रुपयांचा बोगस उत्पन्नाचा दाखला काढल्याचे निदर्शनास आले. त्या व्यक्‍तीविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु बोगस दाखला काढून देणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार पसार झाला आहे. सहकारनगर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो, दिवाळीसाठी पुण्यातून सुटणार १६० जादा गाड्या

दाखल्याची सत्यता कशी ओळखाल

  • सर्वप्रथम  http://aaplesarkar.mahaonline.gov.in (आपले सरकार) या ऑनलाइन पोर्टलचा वापर करा
  • संकेतस्थळावरील उजवीकडील बाजूस असलेल्या ‘प्रमाणित प्रमाणपत्राची पडताळणी’ या पर्यायावर क्‍लिक करा
  • प्रमाणित प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी पर्याय उपलब्ध होतील
  • पर्याय निवडून बारकोड क्रमांक टाका
  • बारकोड वैध नसेल तर नो रेकॉर्ड प्रेझेंट असा संदेश येईल
  • बारकोड वैध असल्यास दाखला दिलेल्या व्यक्‍तीची माहिती दिसेल

नागरिकांनी बोगस उत्पन्नाचे दाखले घेऊ नयेत. एजंट फसवणूक करू शकतात. शहरात असे अनेक बोगस दाखले असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वितरित करण्यात आलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याची चौकशी करण्यात येणार आहे. नागरिकांनी महा ई सेवा केंद्र आणि सेतू केंद्रातून दाखले घ्यावेत. इतर कोठून दाखले काढू नयेत; अन्यथा संबंधित व्यक्‍तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल. 
- तृप्ती कोलते-पाटील, तहसीलदार, पुणे शहर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bogus certificate for grain crime Agent