अपघातांना रोखण्यासाठी आता 'हिल गँग'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

कर्जत आणि खंडाळा दरम्यान तसेच कसारा आणि इगतपुरी दरम्यान ‘हिल गॅंग’ त्यांच्या रॉक क्‍लाइंबिंग आणि माऊंटन रॅपलिंगद्वारे रेल्वे प्रवाशांच्या संरक्षणासाठी आव्हानात्मक परिस्थितीत काम करीत आहे.

पुणे - पावसाळ्यात घाट भागात दरवर्षी दरडी कोसळतात आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. मध्य रेल्वेने आता त्यावर उपाय शोधण्यासाठी ‘हिल गॅंग’ तयार केली आहे. कसलेल्या गिर्यारोहकाच्या धर्तीवर ही गॅंग धोकादायक दरडी शोधून त्यावर बोल्टिंग करीत आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावर सध्या खंडाळा परिसरात ही गॅंग ॲक्‍टिव्ह झाली आहे. 

कर्जत आणि खंडाळा दरम्यान तसेच कसारा आणि इगतपुरी दरम्यान ‘हिल गॅंग’ त्यांच्या रॉक क्‍लाइंबिंग आणि माऊंटन रॅपलिंगद्वारे रेल्वे प्रवाशांच्या संरक्षणासाठी आव्हानात्मक परिस्थितीत काम करीत आहे. दहा जणांचे हे पथक महाराष्ट्रातील लोहमार्गावर असलेल्या घाट भागात काम करत आहे. त्यासाठी त्यांना गिर्यारोहनाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. धोकादायक दरडी शोधून त्यावर बोल्टिंग (स्क्रू फिट करणे) केल्यावर त्या कोसळत नाहीत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही गॅंग रुळांवर पडण्याची शक्‍यता असलेल्या धोकादायक दरडी काढून टाकतात. तसेच कोसळण्याची शक्‍यता असलेला डोंगराचा भाग ते साफ करतात. पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रवाहाच्या मार्गातील अडथळेही दूर करतात. ‘हिल गॅंग’चे पथक दरवर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत रुळांशेजारील डोंगरावर चढून रॅपेलिंगद्वारे असुरक्षित दरडी शोधतात. त्या चिन्हांकित करतात.

यंदा काढल्या ६५० हून दरडी
एप्रिल आणि मे महिन्यात दररोज ४ ते ५ तासांचा ब्लॉक घेऊन अशा चिन्हांकित दरडी ते पाडतात. या वर्षी गॅंगने कर्जत, खंडाळा आणि इगतपुरी परिसरात ६५० हून अधिक धोकादायक दरडी शोधून त्या दररोज ४ ते ५ तासांचा ब्लॉक घेत ६० दिवसांत साफ केल्या, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. यामुळे पुणे-मुंबई तसेच मुंबई-नाशिक प्रवास सुरक्षित झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दरड कोसळून अपघात होतात आणि रेल्वेचे वेळापत्रकही विस्कळीत होते. त्यावर उपाय म्हणून ‘हिल गॅंग’ तयार केली आहे. घाट भागात या गॅंगमुळे अपघातांची शक्‍यता कमी झाली असून, शास्त्रीय पद्धतीने काम सुरू झाले आहे. 
-अनिलकुमार जैन, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bolting on Khandala Ghats