हृदयद्रावक : जन्मदात्या आई-वडिलांना चालले होते आळंदीत सोडून पण...

विलास काटे
Monday, 30 November 2020

तुम्ही आमच्या मुलांवर कारवाई केली तर जीव देवू असे आई-वडिल म्हणाले. मुलं आपल्याला भिक मागण्यासाठी सोडून चाललेत हे कळूनही आईवडिलांची ममता तसूभरही कमी झाली नव्हती.

आळंदी : ज्यांनी 9 महिने गर्भात वाढवून जन्म दिला. पोटाला चिमटा काढून पोटच्या दोन गोळ्यांना लहानाचे मोठे केले. आणि त्याच दोन्ही मुलांनी जन्मदात्या मातापित्यांना घराच्या बाहेरचा रस्ता दाखविण्याचा मार्ग योजिला. ही हृदयद्रावक घटना आळंदीतील प्रसाद विक्रेते व्यापारी सागर मेनकुदळेनी त्यांच्या मित्रांना फोनवरून सांगितली. आणि तत्काळ आळंदीतील सामाजिक काम करणा-या अविरत फाउडेशनचे अध्यक्ष सय्यद निस्सार हे रिक्षावाल्याजवळ आले आणि अधिक विचारपूस करू लागले. रिक्षावाल्याने दर्शनासाठी आलो असे उत्तर दिले. दोन्ही मुलांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मग सय्यद आणि त्यांच्या मित्रांनी दोन्ही लबाड मुलांना आळंदी पोलिस ठाण्यात तुम्हाला नेतो तेथेच सांगा असे खडसावले. यावर आई-वडिलांनाच दया आली. आणि तुम्ही आमच्या मुलांवर कारवाई केली तर आम्ही जीव देवू असे आई-वडिल म्हणाले. मुलं आपल्याला भिक मागण्यासाठी सोडून चाललेत हे कळूनही आईवडिलांची ममता तसूभरही कमी झाली नव्हती. मात्र त्यांच्या पुत्ररूपी दगडाला पाझर फुटला नाही.

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर दुधाचा टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

सय्यद आणि त्यांच्या मित्रांनी आईवडिलांना निर्दयपणे भिक मागण्यासाठी सोडून जाणा-या मुलांना चांगलाच दम दिला. दोन्ही मुले हडपसरजवळ मांजरी गावातील असून, दोन्ही जण रिक्षा चालवतात. आई-वडिल सारखे भांडतात या कारणास्तव आळंदीत सोडून चालले होते. आळंदीतील कार्यकर्त्यांनी अडविल्यावर मात्र दोघेही आई-वडिल मनोरूग्ण आहेत, आम्ही त्यांना मनोरूग्णालयात नेतो असे सफाईदारपणे सांगित होते.

यावर सय्यद यांनी तुमच्या आई-वडिलांना दोघांनाही दिसायचे कमी झाले. आळंदीत दोघं काय खाणार असे विचारले. मात्र मुलं आम्ही सांभाळणार नाही यावर ठाम होती. अखेर खर्ड्या आवाजात आळंदीतील तरूणांनी दमबाजी केल्यावर मोठा मुलगा थोडा समजूतदारपणा दाखवत आम्ही आई-वडिलांना घेवून जातो असे म्हणाला. त्याने आमची चुक झाली असे सांगून रिक्षातून पुन्हा आळंदीतून माघारी गेले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निस्सार सय्यद, केदारेश्वर जाधव, सागर मेनकुदळे, ज्ञानेश्वर स्वामी, प्रतिक आकोटकर यांनी आईवडिलांना घरी घेवून जाण्यासाठी मुलांवर दबाव आणला तसेच पुन्हा आईवडिलांसी असे वाईट वागू नका असाही सल्ला दिला. ही घटना शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी घडली होती. मात्र याचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने करंट्या पुत्रांची आणि आळंदीतील तरूणाईने आईवडिलांना पुन्हा घरी पोचविण्यासाठी केलेल्या मदतीची चर्चा अधिक झाली.

पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, वडगावशेरी, धानोरी भागात मिळणार पुरेसे पाणी कारण..

आणखी काही ज्येष्ठ व्यक्ती मुलं सांभाळ करत नाहीत म्हणून आळंदीत भिक मागून जगत आहेत. तर कुणी घरातील कटकटीला कंटाळून आळंदीत येत आहेत. मात्र स्थानिक पालिका आणि पोलिसांकडे त्यांच्यासाठी कोणतीच तरतूद नाही. इंद्रायणीच्या उघड्या घाटावर थंडीत कुडकुडत शेवटचे दिवस हलाकीत काढत असल्याचे चित्र आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both children took their parents out of the house