esakal | हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला
sakal

बोलून बातमी शोधा

हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला

विहिरीत बुडालेल्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी वडिलांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण वडिलही बुडू लागल्यामुळे त्यांनी विहिरीतील पाईपाचा आधार घेतला. काही क्षणातच मुलगा पुन्हा विहिरीत बुडाला.

हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला

sakal_logo
By
डी. के. वळसे-पाटील

मंचर : विहिरीत बुडालेल्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी वडिलांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण वडिलही बुडू लागल्यामुळे त्यांनी विहिरीतील पाईपाचा आधार घेतला. काही क्षणातच मुलगा पुन्हा विहिरीत बुडाला. आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे गावाच्या उत्तर बाजूला माथावस्ती येथे हि घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव कृष्णा सखाराम शेळके (वय १८, मूळ गाव परभणी) आहे. मजूर करून गुजराण करणाऱ्या कुटुंबातील हा मुलगा आहे. रात्री सात वाजेपर्यंत तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले नव्हते.

हेही वाचा : बारामतीत एकाने सुरू केले `शोले` स्टाईल आंदोलन सुरू 

गावडेवाडी व टाव्हरेवाडी या दोन गावाच्या हद्दीवर पांडुरंग बाबुराव गावडे यांच्या मालकीची विहीर आहे. शेळके कुटुंब परिसरात शेतमजूर म्हणून काम करत आहेत. पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी कृष्णा विहिरीवर गेला होता. तोल गेल्यामुळे कृष्णा विहीरीत पडल्याचे पाहून एका मुलीने पळत जावून हि माहिती जवळच असलेल्या शेतात काम करत असलेल्या त्याचे वडील सखाराम भीमराव शेळके यांना सांगितली. वडील व त्याचे मामा अर्जुन सावळे (वय २१, रा.परळी वैजनाथ जि. बीड) या दोघांनी विहिरीत उड्या टाकल्या. वडिलांनी कृष्णाला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने वडिलांनाच मिठी मारली. त्यामुळे वडीलहि पाण्यात बुडू लागले. प्रसंगावधान राखून वडील सखाराम यांनी पाईपाला पकडले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. 

हेही वाचा  : पुण्यात आणखी एका ठिकाणी आग; 500 रहिवाशांना सुखरुप बाहेर काढलं

विहिरीत पन्नास फूट खोल पाणी आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. वनखात्याच्या पथकातील तरुणांनी  कृष्णाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही.  या घटनेबाबत एनडीआरएफला कळविण्यात आले आहे. पण सदर पथक शनिवारी (ता. ७) सकाळी येणार असल्याचे सांगण्यात आले. मुलगा कृष्णाला पोहता येत नव्हते, अशी माहिती शेळके कुटुंबियांनी सांगितली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)