'शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला करा, नाहीतर आम्ही उघडू'; ब्राह्मण महासंघाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक स्थळे उघडण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली. महाराष्ट्र सरकारनेही ऐतिहासिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली, पण पुरातत्व खात्याला अजूनही जाग आलेली दिसत नाही.

पुणे : राज्यात अनलॉक सुरू असताना बंद असलेल्या सर्व गोष्टींना सुरू करण्यास हळूहळू परवानगी देण्यात येत आहे. राज्यातील धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळे सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे; परंतु असे असतानाही पुण्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला शनिवारवाडा मात्र अजूनही बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बंद असलेला हा शनिवारवाडा पर्यटकांसाठी तातडीने सुरू करावा, अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

पुरातत्व खात्याने दोन दिवसांत शनिवारवाडा पर्यटकांसाठी न उघडल्यास ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी स्वतःहून शनिवारवाडा उघडतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

प्राध्यापकांचे पगार वेळेत करा, अन्यथा...; उच्च शिक्षण संचालक आदेशात काय म्हणाले?

दिवाळी सुट्टीत अनेक पर्यटक शनिवारवाडा पाहण्यासाठी येत असतात. मात्र, वाडा बंद असल्याने पर्यटक पुन्हा माघारी जाताना दिसत आहेत. लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक स्थळे उघडण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली. महाराष्ट्र सरकारनेही ऐतिहासिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली, पण पुरातत्व खात्याला अजूनही जाग आलेली दिसत नाही. त्यामुळेच की काय पुण्यातील शनिवारवाडा अजूनही बंद अवस्थेत आहे.

पुण्यात होतंय मुळशी पॅटर्नच्या रिमेकचं शूटिंग​

दिवाळीनिमित्त किंवा इतर काही कारणांसाठी बाहेरगावचे लोक पुण्यात आल्यानंतर त्यांना शनिवारवाडा पाहण्याची इच्छा असते. परंतु तो बंद असल्यामुळे त्यांना पाहता येत नाही. हा पुणेकरांचा अपमान आहे, असं आम्ही मानतो. त्यामुळे हा शनिवारवाडा ताबडतोब पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात आम्ही पुरातत्व खात्याला निवेदन देणार आहोत. त्यानंतर पुढच्या दोन दिवसात पुरातत्व खात्याने शनिवारवाडा उघडला नाही, तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊन पर्यटकांसाठी शनिवारवाडा खुला करू, असा इशारा ब्राह्मण महासंघाने यावेळी दिला. मात्र, वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर असल्याने ४ दिवस थांबण्याची विनंती पुरातत्व खात्यातील अधिकाऱ्यांनी केली आहे. 

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brahmin Mahasangh demanded that Shaniwar wada should be started immediately for tourists