पूना हॉस्पिटल रिसर्च सेंटर : पेशंटमधील माणूस जपणारा कोविडयोद्धा

logo.jpg
logo.jpg

कोविड १९ मुळे डॉक्‍टर आणि पेशंट्‌स हे दोघांसाठी मृत्यूचा धोका सारखाच आहे. या दोन्हींमध्ये ‘माणूस’ हा घटक सामाईक आहे. त्यामुळे आम्ही पेशंट्‌सवर उपचार करताना, या रोगाचा धोका लक्षात घेता आम्हाला आमचीही तितकीच काळजी घ्यावी लागते. कारण आम्ही निष्काळजीपणा केला तर त्यातील धोके घातक ठरू शकतात. त्यामुळे आम्ही लोकांना वारंवार विनंती करतोय की मास्कचा वापर न कंटाळता करा. ते तुमच्याच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, अशी कळकळीची विनंती पूना हॉस्पिटलचे पल्मनोलॉजिस्ट डॉ. नितीन अभ्यंकर यांनी केली आहे. डॉ. अभ्यंकर यांचा गेली ३० वर्षांहून अधिक फुफ्फुसांवरील आणि छातीचे विकार या विषयांवर दांडगा अभ्यास आहे. सध्याच्या कोविड १९ च्या अचानक आलेल्या संकटामुळे वैद्यकीयक्षेत्राची परिभाषाच बदलून गेली आहे, असे ते आवर्जून सांगतात. ते म्हणतात की, सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये जेव्हा कोविड १९ चे रुग्ण दाखल झाले तेव्हा आम्हालाही हे सगळं नवीनच होतं. या पेशंट्‌सवर उपचार करताना पहिल्यांदा प्राथमिक उपचार नेमके कसे करायचे याबाबत संभ्रम होता. पेशंट्‌सना वाचवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व शक्‍यतांचा पुरेपूर वापर करत होतो. आमच्यासाठी देखील ही नवीनच ‘प्रॅक्‍टिस’ होती. पूर्णपणे नवीन आजार आणि पूर्ण पणे अनोळखी उपचार यामुळे सुरवातीच्या काळात बरीच करसत करावी लागली.

खोकला, ताप आणि धाप लागणे. ही प्राथमिक लक्षणे कोविड १९ ची आहेत. पण हा आजार गंभीर झाल्यास त्याचा थेट परिणाम फुफ्फुसांवर होतो. याला कोविड न्यूमोनिया असे म्हणतात. ह्रदयाच्या स्नायूंना सूज आणि ह्रदयाचे पंपिंग कमी होणे अशी गुंतागुंत काही रुग्णांच्या बाबतीत निर्माण होते. आणि यांच्या जीवाला खूप धोका असतो. वास्तविक हार्टअटॅक आणि कोविड १९ मुळे ह्रदयाला येणारी सुज आणि हार्टअटॅक यामध्ये खूप साम्य असू शकते. त्यामुळे निदान करणे काही वेळेला अवघड असते. हार्टअटॅकमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने त्यावर अँजिओग्राफी, अँन्जिओप्लास्टी करून उपचार करता येतो. पण कोविड १९ मुळे फुफ्फुसांवर आणि ह्रदयावर ताण आला तर त्यावर विशिष्ठ उपचार नाहीत.

कोविड निमाेनिया होण्याचे प्रमाण २० टक्के असते. पण गंभीररीत्या आजारी रुग्णांपैकी ३ टक्के रुग्ण मृत्यूमुखी पडतात. तर दुसरीकडे, पुण्यात कोविड १९ ची संख्या दिवसेदिवस वाढते आहे. याचा अर्थ की, ज्या लोकांची प्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनाच याचा धोका सर्वाधिक आहे. पण दुसरीकडे, ज्या व्यक्तींना पूर्वीपासूनच किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, मधुमेह यांसारखे आजार आहेत, त्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. हे प्रमाण ६० पेक्षा अधिक वय असलेल्यांमध्ये अधिक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेणे याकाळात अत्यंत महत्त्वाचे आहे.
आज लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पेशंट्‌सची संख्या दुप्पट वेगाने वाढत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. पूना हॉस्पिटलमध्ये देखील कोविड १९ ची संख्या वाढत आहे. हॉस्पिटलचा तिसरा मजला संपूर्ण कोरोना वॉर्ड म्हणून घोषित करण्यात आला आहे. यातील अंदाजे ६ रुग्ण अत्यवस्थ आहेत. आणि शिवाय ४४ त्यामानाने चांगल्या स्थितीत असणाऱ्या रुग्णांवर तर उपचार सुरू आहेत. आमची संपूर्ण टीम किमान तीन शिफ्ट्‌समध्ये ६-६ तास सलग काहीही न खाता-पिता अविरतपणे रुग्णसेवा करत आहेत. यात आम्हाला रुग्णांसोबत आमच्या स्टाफचीही तितकीच काळजी घ्यावी लागत आहे. कारण ही रुग्णसेवा करताना आमचे वॉर्डबाँय, नर्सेससह सर्व हॉस्पिटलचा स्टाफ रात्र-दिवस काम करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे मानसिक मनोबल सतत वाढवत ठेवणे हे आमच्यासमोर आव्हान आहे.

लॉकडाऊन हा एकमेव प्रभावी उपाय कोरोनाची घोडदोड तात्पूरती रोखू शकतो. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर औषधे शोधण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. पण आज आम्ही वापरत असलेली सर्व औषधे ही ‘रिपर्पज’ आहेत. याचाच अर्थ या औषधांचा वापर याआधी कोरोनासारख्याच विविध आजारांवरील उपचारांसाठी करण्यात आला आहे. सध्यातरी  स्टिराँईड प्रभावी कामकरता दिसतात. या खालाेखाल टोसिलीझोॲप हे औषध गंभीर रुग्णांना काही प्रमाणात उपयुक्त ठरत आहे. आजमितीला कोरोनावर रामबाण औषध उपलब्ध नाही. तर प्लाझ्मा ट्रान्सफ्यूजन हा उपाय क्निनिकल ट्रायल्समधून पडताळला जात आहे. मास्कचा वापर हाताचे निर्जंतुकीकरण आणि सोशल डिन्टंसिंग यांचा शिस्तशीर वापर पुढचे वर्ष-दीड वर्ष केल्यास आपण कोरोनाचा प्रसार रोखण्यास नक्कीच हातभार लावू.

डाॅ. नितीन अभ्यंकर, पूना हॉस्पिटल,   

संपर्क : ०२०-६६०९६०००,

पत्ता - २७, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com