माशांचे प्रजनन चक्क सुळक्यांवर

Murya-Fish
Murya-Fish

पुणे  - आठ महिने पश्‍चिम घाटातील नद्यांमध्ये वास्तव्य आणि चार महिने प्रजननासाठी किल्ले, सुळक्‍यांवरील पाणवठ्यांत आढळणारे मासे माहीत आहेत तुम्हाला? होय, हे मासे नद्यांमधून किल्ले, सुळक्‍यांवर चढून तेथे पिले जन्माला घालतात. आश्‍चर्य वाटले ना! या माशांना स्थानिक भाषेत मुऱ्या असे म्हणतात. त्यांच्या प्रजननाविषयी प्रथमच संशोधन करण्यात आले असून, सुमारे सोळाशे मीटर उंचीवर या माशांनी आपला अधिवास शोधला आहे.

गुजरातमधील डांग या पश्‍चिम घाटाच्या उत्तरेच्या टोकापासून थेट अंबोलीपर्यंत या माशांचे अस्तित्व आहे. मराठा लोचेस किंवा इंडोरिओनेक्‍टस इव्हरझार्डी असे शास्त्रीय नाव असलेले हे मासे चक्क खडक चढून जातात. अर्थात, हे मासे पाण्याबाहेर कसे राहतात, असा प्रश्‍न पडला असेल. मात्र, धबधबे आणि खडकांवरून कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या उलट दिशेने त्यांचा प्रवास सुरू होतो. त्यांना असलेल्या विशिष्ट कल्ल्यांमुळे ते खडकांना चिकटून चढतात. त्यांचा हा प्रवास पावसाळा स्थिरावल्यावर म्हणजे धबधबे, प्रवाह सुरू झाल्यावर सुरू होतो. याच काळात पश्‍चिम घाटात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने नद्या तुडुंब असतात. त्यामुळे नद्यांमध्ये प्रजनन करणे शक्‍य होत नसल्याने हे मासे उंचावर जात असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.

माशांना चढाईसाठी एक ते पंधरा दिवसांचा अवधी लागतो. पश्‍चिम घाटातील गड, किल्ले, सुळक्‍यांवर पाणवठे आढळतात. या ठिकाणी हे मासे अंडी घालतात. त्यांना लागणारे खाद्य या काळात मुबलक असते. दऱ्यांमधील तापमानापेक्षा येथील तापमान तुलनेने थंड असते. त्याचप्रमाणे हा प्रदेश मानवाच्या हस्तक्षेपाविना असल्याने त्यांच्यासाठी हा अधिवास सुरक्षित मानला जातो. सुमारे चार महिन्यांचा काळ येथे काढतात. मध्यम आकाराचे मासे झाल्यावर पावसाळा संपण्यापूर्वी पुन्हा खाली नदीत उतरतात. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतील संशोधक उन्मेष कटवटे यांच्यासह अश्‍विनी केसकर, डॉ. राजीव राघवन, मंदार पैंगणकर, प्रदीप कुमकर, श्रीकांत जाधव, आनंद पाध्ये, नीलेश डहाणूकर यांनी २०१३ पासून या माशांवर संशोधन सुरू ठेवले आहे. येथे होत असलेल्या विकासकामांमुळे या अधिवासावर संकट उभे ठाकले असल्याचे कटवटे यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com