पिंपरीत खून लपवण्यासाठी केला अपघाताचा बनाव 

संदीप घिसे
शनिवार, 13 एप्रिल 2019

संगीता मनीष हिवाळे असे खून झालेल्या बहिणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा भाऊ जॉन डॅनियल बोर्डे (वय ४०, रा. सौंदर्य कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) याला अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक उद्धव खाडे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी (पुणे) : प्रॉपर्टीचे पैसे मागते म्हणून बहिणीचा डोके आपटून तिचा खून केला. हा खून लपविण्यासाठी हृदयविकाराचा झटका आलेल्या बहिणीला रुग्णालयात नेत असताना मोटारीला आग लागून त्यात तिचा मृत्यू झाल्याचा देखावा भावाने निर्माण केला. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत अपघाताचा बनाव आठ महिन्याने उघडकीस आला. याप्रकरणी खूनी भावावर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संगीता मनीष हिवाळे असे खून झालेल्या बहिणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा भाऊ जॉन डॅनियल बोर्डे (वय ४०, रा. सौंदर्य कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) याला अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक उद्धव खाडे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता हिवाळे यांचे पतीशी मतभेद असल्याने त्या आपल्या भावाच्या जवळ मुलांसह राहात होत्या. ९ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आरोपी जॉन यांचे आपली बहीण संगीता हिच्याशी पैशावरून वाद झाले. यावेळी जॉन यांनी संगीताचे डोके जोरात फरशीवर आपटले. या घटनेत संगीता यांचा मृत्यू झाला, खुनाचा हा प्रकार उघडकीस येऊ नये आणि बहिणीच्या विम्याचे ३० लाख रूपये मिळावेत म्हणून जॉन याने आपली आई व संगीता यांचा मुलगा यांना बोलावून संगीता ही हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले.

मोठ्या रुग्णालयात घेऊन जाऊ, असे सांगत संगीता त्यांचा मुलगा व आई यांना जॉन याने एमएच-१४-ईएम-३७०९ या मोटारीत बसवले. सयाजी हॉटेलच्या पुढे मुंबई बेंगलोर महामार्गावर निर्मनुष्य ठिकाणी गाडीमध्ये बिघाड झाल्याचा बहाणा जॉन याने केला. संगीता यांच्या मुलास बोनेट उघडून समोर उभे राहण्यास सांगितले. त्यावेळी जॉन यांची आई लघुशंकेसाठी करता गेली होती. ही संधी साधत आरोपी जॉन याने बहिणीच्या अंगावर तसेच मोटारीमध्ये पेट्रोल टाकून लायटरने मोटार पेटवून दिली. शॉर्ट सर्किटमुळे मोटार पेटून त्यात बहिणीचा मृत्यू झाल्याचे आरोपी जॉन याने सर्वांना भासविले. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी जॉन याने खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी जॉन याला अटक केली आहे.

Web Title: brother killed sister for property in Pimpri