
देशात स्टार्टअप संस्कृती रुजू लागली आहे : डॉ. रघुनाथ माशेलकर
पुणे : ‘‘ गेल्या वर्षी प्रत्येक आठवड्यात एक नवीन युनिकॉर्न तयार होत होते. गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात स्टार्टअप संस्कृती रुजू लागली आहे. मेटाव्हर्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने खऱ्या अर्थाने भारत डिजिटल होत आहे. २०३० पर्यंत मेटाव्हर्सची उलाढाल पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत जाईल. त्यामध्ये भारतीय उद्योजकांचा वाटा लक्षणीय असेल’’, असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला. संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी लिहलेल्या व ‘मेनका प्रकाशना’च्या ‘आजचे स्टार्टअप्स, उद्याचे युनिकॉर्न्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मेटाव्हर्समध्ये (तंत्रज्ञानाधारित आभासी विश्व) शनिवारी (ता.२५) करण्यात आले. त्यावेळी डॉ. माशेलकर बोलत होते.
‘मेनका प्रकाशन’चे व्यवस्थापकीय संचालक अभय कुलकर्णी, मेटाव्हर्समधील प्रकाशनाचे आयोजन करणारे ‘क्रेसेन्डो वर्ल्डवाईड’चे सहसंस्थापक अतुल काळूस्कर आणि विशाल जाधव यावेळी उपस्थित होते. डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘भारतातील स्टार्टअप कंपन्यांचा प्रवास खरोखरीच प्रेरणादायी आणि विस्मयकारक आहे. देशातील एकूण स्टार्टअप कंपन्यांपैकी जवळपास ५० टक्के उद्योजक टियर टू किंवा टियर थ्री शहरांमधील आहेत. अर्थपुरवठ्यापेक्षाही तरुणाईवर ठेवला जाणारा विश्वास अशा स्टार्टअप्ससाठी महत्त्वाचा असतो. श्रीमंतांसाठी उच्च दर्जाचे आणि गरिबांसाठी हलक्या दर्जाचे तंत्रज्ञान ही विषमताच संपुष्टात आणणे हे आव्हानात्मक आहे. ही दरी मिटवून सर्वांसाठी समान तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात भारतीय स्टार्टअप मोलाची भूमिका बजावतील, अशी मला खात्री आहे.’’
पुण्यातील पाच ते सहा स्टार्टअप्सचा युनिकॉर्न्सच्या यादीत समावेश झाला आहे. यातील निवडक स्टार्टअप्सच्या यशोगाथा ‘आजचे स्टार्टअप्स, उद्याचे युनिकॉर्न्स’ या पुस्तकात मांडण्यात आलेल्या आहेत. अॅपकार्ट, कॉग्निजिक्स, क्रेसेन्डो वर्ल्डवाईड, फायडेलटेक, नेक्स्टजेन सीएफओ, क्वांटेस्ला, रचना रानडे, रिपोज एनर्जी, रिस्क प्रो, रुद्र सोल्यूशन, स्प्रिंग कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज इत्यादी स्टार्टअप्सचा प्रवास या पुस्तकात आहे. या स्टार्टअप्सच्या संस्थापकांचा सत्कार डॉ. माशेलकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
मेटाव्हर्समध्ये प्रकाशन झालेले पहिलेच पुस्तक
मेटाव्हर्समध्ये प्रकाशित होणारे हे पहिलेच मराठी पुस्तक आहे. तर यापूर्वी जगात केवळ एकच पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या माध्यमातून एका मराठी पुस्तकाने इतिहास रचला आहे, अशी माहिती लेखक डॉ. शिकारपूर यांनी दिली.
बालेवाडी : ‘आजचे स्टार्टअप्स, उद्याचे युनिकॉर्न्स’ या पुस्तकाचे मेटाव्हर्समध्ये प्रकाशन करताना (डावीकडून) डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. रघुनाथ माशेलकर, अभय कुलकर्णी, विशाल जाधव आणि अतुल काळूस्कर.
Web Title: Business Tycoons Publication Startup Initiative Dr Raghunath Mashelkar Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..