फुफ्फुसाची कार्यक्षमता ५ टक्के अन् ऑक्सिजनची पातळी ७५; तरीही त्याने कोरोनावर केली मात!

Yavat_Corona_Patient
Yavat_Corona_Patient

केडगाव (पुणे) : देऊळगावगाडा (ता.दौंड) येथील कोवीड केअर सेंटरमध्ये फुफ्फुसाची पाच टक्के कार्यक्षमता आणि ऑक्सिजनची पातळी ७५ पर्यंत खाली आलेला गंभीर स्थितीतील रुग्ण (वय ४३)  दाखल झाला. डॉक्टरांनी रुग्ण वाचण्याची खात्री नातेवाईकांना दिली नाही. मात्र, शर्थीचे प्रयत्न चालू ठेवले. या प्रयत्नांना प्रतिसाद मिळाल्याने रुग्ण २०व्या दिवशी स्वतःची मोटार चालवत घरी गेला. रुग्णालयातून बाहेर पडताना रुग्णाने डॉक्टरांचे पाय धरले. यावेळी रूग्णाला अश्रू आवरता आले नाही.

यवतमधील एका व्यावसायिकाला कोरोनाची लक्षणे दिसत असताना त्यास नेमके उपचार मिळाले नाहीत. त्रास वाढल्याने रुग्ण धापा टाकत हडपसरमधील एका मोठ्या रूग्णालयात गेला. तेथे व्हेंटिलेटर बेड रिकामे होणार होते. सायकांळी बेड मिळेल मात्र कोरोना अहवाल असल्याशिवाय दाखल करून घेणार नाही. असे रुग्णास सांगितले गेले. व्यावसायिक सायंकाळपर्यंत रुग्णालयात थांबून होते. रुग्णाचे दुर्देव असे की, त्याच्या मागून आलेला रूग्ण कोरोना अहवालासह आला अन् हॅास्पिटलने त्याला बेड दिला. व्यावसायिकाला सांगितले की बेड उपलब्ध नाही. तुम्ही इथे थांबू नका.

त्यानंतर रूग्णाची धाकधूक वाढली. त्यांनी हडपसरमधूनच यवतचे पत्रकार संदीप चाफेकर यांच्याशी संपर्क साधला. चाफेकर यांनी तीन-चार ठिकाणी चौकशी केली, पण व्हेंटिलेटर बेड मिळत नव्हता. देऊळगावगाडा येथील कोवीड सेंटर प्रमुख डॉ. भरत खळदकर यांच्याशी संपर्क साधला. तेथे सुदैवाने व्हेंटिलेटर बेड नुकताच रिकामा झाला होता. रुग्णास चालताना खूपच त्रास जाणवत होता. ऑक्सिजन पातळी ९० पेक्षा कमी असेल, तर ती धोकादायक पातळी समजली जाते. व्यावसायिक कोवीड सेंटरमध्ये आले, तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेव्हल ७५ होती.

कोरोनाचा अहवाल यायला अवकाश होता. अहवाल आल्यानंतर उपचार केले असते, तर रुग्णाच्या जीवाला धोका वाढणार होता. डॉ. खळदकर यांनी अहवालाशिवाय उपचार चालू केले. पहिले नऊ दिवस रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर सहा दिवस ऑक्सिजनवर होते. दोन दिवसांपूर्वी फुफ्फुसाची कार्यक्षमता ६० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे एक्स-रेमधून दिसून आले. पुढील दोन महिन्यात ही क्षमता १०० टक्क्यांपर्यंत वाढेल. निर्णय पटापट घेत उपचार केल्याचे डॉ. खळदकर यांनी सांगितले.  

डॉक्टर माझे देवदूत ठरले  
उपचारांबाबत व्यावसायिक म्हणाले, डॉ. खळदकर माझ्यासाठी देवदूत आहेत. माझा पुनर्जन्म झाला आहे. या कोविड सेंटरमधील ८५ वर्षांची आजी कोरोनातून सुखरूप बाहेर आली अन् तिच्याकडे पाहत माझीही जगण्याची उमेद वाढली. या सेंटरमध्ये मला चांगले उपचार मिळाले. कर्मचारी मानेखाली हात घालून मला जेवायला उठवत होते. इतकी काळजी कदाचित पुण्यात घेतली गेली नसती. ग्रामीण भागात चांगले उपचार मिळाल्याचे खूप समाधान आहे. यवतचे डॉ. शशिकांत इरवाडकर आणि कुलदीप भागवत यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com