कोरोनामुळे मृत्यू, अॅम्ब्युलन्स अभावी अंत्यसंस्कारात अडथळा; मनसे नेत्यानं फोडली अधिकाऱ्यांची गाडी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

शहरात कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढतच आहे. रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांत घडले आहेत.

पुणे : कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याला अंत्यसंस्काराला घेऊन जाण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाची सोमवारी (ता.७) दुपारी तोडफोड केली. पालिकेच्या आवारात पार्क असलेल्या गाडीच्या काचा मसनेचे गटनेते वसंत मोरे यांनी फोडल्या.

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

शहरात कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढतच आहे. रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांत घडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित होत आहेत. रुग्णांना रुग्णालयांत घेऊन जाण्यासाठी तसेच एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करायला नेण्यासाठी लवकर रुग्णवाहिका मिळत नाही. याच प्रकारामुळे चिडून जाऊन प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करीत मोरे यांनी ही तोडफोड केली.

मोरे यांनी याबाबत सांगितले की, रविवारी माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करायला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळण्याची मागणी त्याच्या कुटुंबाने पालिकेकडे केली होती. मात्र तीन तास उलटल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे मृत्यू झालेल्या पुणेकरांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसेल, तर अधिकाऱ्यांना देखील गाडीत बसण्याचा अधिकार नाही. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी काय नियोजन केले आहे, असा प्रश्‍न देखील यावेळी मोरे यांनी उपस्थित केला.

शेतकरी मालामाल, टोमॅटोची दोन तासांतच साडेतीन कोटीची उलाढाल

मृत्यूनंतर तरी हाल करू नका :
प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाले. असे प्रकार सध्या दररोज घडत आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात नंबर लावावे लागत आहेत. जिवंतपणे त्यांना आरोग्याच्या चांगल्या सेवा प्रशासन देवू शकत नाही. मृत्यू झाल्यावर तरी किमान त्यांचे हाल करू नका, अशी विनंती मोरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS vandalizes government vehicle of PMC officials due to non availability of ambulance