मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cabinet expansion soon Chief Minister

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे - ‘‘राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मंत्रिमंडळ विस्तारला विलंब होत असला तरी सरकार चांगल्या प्रकारे चालले आहे की नाही?, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. दरम्यान, अधिकाऱ्यांनी सरकारी फायलींचा प्रवास कमी करावा. लोकांची कामे तातडीने मार्गी लावावीत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.मुख्यमंत्री शिंदे यांनी येथील विधान भवनात मंगळवारी (ता. २) पुणे विभागातील अतिवृष्टी, पीक पेरणी, कोरोनाची सद्यःस्थिती आणि विकास कामांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्र सरकारशी संबंधित असलेले प्रकल्प आणि अन्य प्रश्नांची यादी तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची योजना थांबली होती, ती कार्यान्वित केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.

‘संजय राऊत यांनाच विचारा’

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांच्या घरात छाप्यात मिळालेल्या रकमेवर 'एकनाथ शिंदे, अयोध्या दौऱ्यासाठी' असे आढळून आल्याची चर्चा आहे. या संदर्भात विचारले असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘ईडीच्या छाप्यात रक्कम कोणाच्या घरात आढळली, त्यांनाच हा प्रश्न विचारा.’’

आढावा बैठकीत काय झाले...

‘‘विभागीय आयुक्तांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घ्यावा. राज्याशी निगडीत केंद्र सरकारकडील प्रलंबित प्रश्नांची यादी तयार करावी. योजना प्रलंबित कशामुळे आहेत? शासन स्तरावर अडचण आल्यास आम्हाला सांगा,’’ असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठकीत दिले.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६६ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी शंभर टक्के काम पूर्ण झाले पाहिजे. काम पूर्ण केले तरच केंद्र सरकारचा निधी मिळेल. विभागीय आयुक्तांनी आवास योजनेतील १० हजार घरांसाठी जागेची अडचण असल्याचे सांगितले. त्यावर शिंदे यांनी ती अडचण दूर करू. तसेच, आवास योजनेत ग्रामीणमध्ये चांगली स्थिती आहे, परंतु पुणे शहर योजनेत मागे असून, घरकुलांचे उद्दिष्ट्य लवकर पूर्ण करावे, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री शिंदे लोकप्रतिनिधींना उद्देशून म्हणाले, ‘‘अजित पवार आणि आपले चांगले संबंध आहेत... पण विरोधक आणि सत्ताधारी म्हणून. अजितदादा हे विरोधासाठी कधी विरोध करीत नाहीत. आम्हाला दुजाभाव करायचा नाही. राज्याला पुढे घेऊन जायचे आहे. केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे. त्याचा राज्यासाठी उपयोग करून घ्यावा.’’

आंबिल ओढ्यासाठी संरक्षक भिंत

पुणे शहरातील आंबिल ओढ्याला पूर आल्यामुळे लगतच्या सोसायट्या आणि घरांचे नुकसान झाले होते. त्या ओढ्यालगत संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव पाठविला आहे, असा मुद्दा आमदार माधुरी मिसाळ यांनी उपस्थित केला. त्यावर महापालिका आयुक्तांनी याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

‘हर घर तिरंगा’

विभागातील पाच जिल्ह्यांत ५० लाख ९३ हजार घरांवर तिरंगा ध्वज फडकावण्याचे उद्दिष्ट्य आहे. केंद्र सरकारकडून १५ लाख ध्वज, कापड उद्योग आणि महिला बचत गटांच्या मदतीने ‘हर घर तिरंगा’चे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात येणार आहे, असे आयुक्त राव यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

  • पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ नियोजित जागेवरच

  • वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासकामांना स्थगिती नाही.

  • केंद्राचा निधी प्रशासनाच्या चुकीमुळे परत जाणे योग्य नाही.

  • प्रशासनाने लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन कामे करावीत.

  • राज्य सरकार तुमच्या पाठीशी, मला प्रशासनाची साथ हवी

  • अतिवृष्टीमुळे पाचही जिल्ह्यांतील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत

  • विकास कामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही.

Web Title: Cabinet Expansion Soon Chief Minister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top