केबल व्यावसायिकांमध्ये संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पिंपरी - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी नव्याने जाहीर केलेले नियम शनिवारपासून (ता. २९) लागू होणार आहेत. मात्र, या नियमांचे नेमके स्वरूप स्पष्ट नसल्यामुळे ग्राहकांसह केबल व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

पिंपरी - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी नव्याने जाहीर केलेले नियम शनिवारपासून (ता. २९) लागू होणार आहेत. मात्र, या नियमांचे नेमके स्वरूप स्पष्ट नसल्यामुळे ग्राहकांसह केबल व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

‘ट्राय’ जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार पहिल्या शंभर दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी ग्राहकांना १३० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी असे मिळून १५३ रुपये ६० पैसे द्यावे लागणार आहेत. ज्या ग्राहकांनी वर्षभराचे पैसे केबल व्यावसायिकांकडे अथवा दूरचित्रवाणी वाहिन्यांची सेवा पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांकडे भरलेले आहेत. अशा ग्राहकांनी नव्या नियमानुसार कोणत्या वाहिनीसाठी किती रक्कम भरायची, या बाबत ग्राहकांत तसेच केबल व्यावसायिकांमध्येही संभ्रम आहे. ग्राहकांनी वर्षभराचे पैसे भरून घेतलेल्या सध्याच्या ‘पॅकेज’च्या रकमेचा फरक नवीन ‘पॅकेज’ घेतानाच्या रकमेत समाविष्ट केला जाणार असल्याचे काही केबल व्यावसायिकांनी सांगितले.

केबल व्यावसायिक समीर जवळकर म्हणाले, ‘‘फ्री-टू एअर १०० वाहिन्यांमध्ये दूरदर्शनच्या २६ वाहिन्या, जाहिरातीसाठी वाहिन्यांचा जास्त समावेश आहे. त्यानंतरच्या १ ते २५ वाहिन्यांसाठी २० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. यात ग्राहकाने एक वाहिनी निवडली तरीही त्याला २० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. या नवीन नियमांबाबत ९० टक्के केबल व्यावसायिक अनभिज्ञ आहेत.

दूरचित्रवाणी वाहिन्यांची सेवा घेण्यासाठी महिना तीनशे रुपये देतो. या रकमेत सध्या ज्या वाहिन्या बघण्यास मिळतात. त्यासाठी ‘ट्राय’च्या नव्या नियमानुसार किती रक्कम द्यावी लागेल, या बाबत काहीही माहिती नाही. 
- अनंत कुलकर्णी, केबल ग्राहक, चिंचवड

अनेक केबल ऑपरेटरला ‘ट्राय’च्या या नवीन नियमांबाबत नेमकी माहिती नाही. दूरचित्रवाणी वाहिन्यांची सेवा आम्ही ज्या कंपन्यांकडून घेतो, अशा कंपन्यांकडूनही आम्हाला नवीन नियमांबाबत लेखी स्वरूपात काहीही कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक बाबी स्पष्ट न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. 
-  सतीश कांबिये, अध्यक्ष, युनायटेड केबल ऑपरेटर असोसिएशन, पिंपरी-चिंचवड

शहरातील केबल व्यवसायाची स्थिती
 सेवा देणाऱ्या कंपन्यांची संख्या - ६
 केबल व्यावसायिकांची संख्या - १३० ते १५०
 केबल ग्राहकांची संख्या - सुमारे अडीच लाख 
 ग्राहकांकडून दर महिन्याला जमा होणारा महसूल - साडेसात कोटी रुपये

Web Title: Cable Businessman Confuse