कॅकट्स वर्गातील रोपांना ग्राहकांची पसंती

कृष्णकांत कोबल 
शनिवार, 17 मार्च 2018

मांजरी (पुणे) : घर किंवा आॅफीसमध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक शोभेच्या रोपांपेक्षा कॅकट्स वर्गातील रोपांना पसंती मिळू लागली आहे. मातीशिवाय किंवा कोकोपीटमध्ये वाढणारी, देखभालीला सोपी आणि विविध आकारातील आकर्षक कुंड्यांमध्ये ही रोपे उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणातील व्यवसायिक व नोकरदार ग्राहकांकडून त्याला मागणी होत आहे. त्यामुळे अनेक रोपवाटिका चालकांनी पिशवितील मोठ्या रोपांच्या निर्मितीला फाटा देवून अशा उत्पादनावर भर दिला आहे. 

मांजरी (पुणे) : घर किंवा आॅफीसमध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक शोभेच्या रोपांपेक्षा कॅकट्स वर्गातील रोपांना पसंती मिळू लागली आहे. मातीशिवाय किंवा कोकोपीटमध्ये वाढणारी, देखभालीला सोपी आणि विविध आकारातील आकर्षक कुंड्यांमध्ये ही रोपे उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणातील व्यवसायिक व नोकरदार ग्राहकांकडून त्याला मागणी होत आहे. त्यामुळे अनेक रोपवाटिका चालकांनी पिशवितील मोठ्या रोपांच्या निर्मितीला फाटा देवून अशा उत्पादनावर भर दिला आहे. 

गेली अनेक वर्षांपासून योथील सोलापूर महामार्गाच्या दुतर्फा रोपवाटिका उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पारंपारिक रोपवाटिकेबरोबरच अनेक हायटेक रोपवाटिकाही या परिसरात पाहवयास मिळतात. दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा आदी राज्यांतून येथे रोपांची आयात-निर्यात होताना दिसते. गुजरात, दिल्लीपर्यंत येथील मालाला मागणी आहे. येथील ग्राहकांच्या मागणीनुसार दक्षिणेतूनही नारळ, पाम, आंबा आदी रोपांची आवक येथे होत आहे.

शहरातील नागरिक, जमीन विकसक, छोटेमोठे व्यवसायिक यांच्याकडून होणारी छोट्या शोभिवंत रोपांची मागणी, मोठ्या झाडाच्या रोपांची रोडावलेली मागणी, त्यासाठी लागणारी मोठी जागा, मजूर व पाणी टंचाई याचा विचार करता मागणी असलेल्या छोट्या आकर्षक रोपांची निर्मिती रोपवाटिका उद्योजकांना परवडू लागली आहे. शहरातील नागरिकांकडून पिशवितील किंवा मोठ्या रोपांना मागणी नसून कुंडीतील कॅकटस् वर्गीय रोपांना मागणी वाढत आहे. त्यामुळे येथील काही मोजक्या रोपवाटिका व्यवसायिकांनी छोट्या, हाताळण्यास सोप्या, आकर्षक, कमी कष्ट लागणाऱ्या व नागरिकांकडून अधीक मागणी होत असलेल्या छोट्या रोपांच्या निर्मितीला प्राधान्य दिलेले दिसत आहे. 

बिनकाट्यांचे सक्युलन्टस् व काट्यांचे कॅकट्स या प्रवर्गातील देशी-विदेशी सुमारे 200 च्यावर रोपे येथे पाहवयास मिळतात. टिलेन्सिया, स्पॅनिश माॅस, डिस्केडिया, क्रिप्टॅन्थस, सीडम, इचावेरिया, कोरफड प्रकार, लकी प्लॅन्ट म्हणून मागणी असलेला क्राॅसुला, सॅन्सेवेरिया तसेच नेचामधील पाच प्रकारचे  अॅस्प्लेनियम, ट्रीफन, मेडन हेअर फन अशा रोपांना मोठी मागणी होत आहे.

गोव्याचे ग्राहक सफन दास म्हणाले, "आपल्याकडे इतरांपेक्षा वेगळं काहितरी असावं अशी भावना सगळ्यांचीच असते. त्यामुळे इतरांपेक्षा नवीन शोभिवंत रोपांना गोव्यात मागणी वाढली आहे. एखादे रोप आवडलेकी पैशाचाही विचार ग्राहक करीत नसल्याचे जाणवते. मी कायम या परिसरातून रोपे खरेदी करीत असतो. सोलापूर महामार्गालगत शहरा बाहेर रोपांची चांगली खरेदी होते.''
 
रोपवाटिका व्यवसायिक प्रितम मोरे म्हणाले, "शहर परिसरात मोठ्या झाडांची मागणी कमी झाली आहे. त्या तुलनेत डीश गार्डन, टेरिरियम व कॅकटसला मोठी मागणी आहे. कमी जागा, कमी खत-पाणी, हाताळण्यास सोपी व इतर आर्टिफिशियल वस्तूंपेक्षा मनाला समाधान देणारी रोपे म्हणून या रोपांना ग्राहकांकडून पसंती मिळते. पन्नास रूपयांपासून दोन हजार रूपयांपर्यंत किंमतीची रोपे उपलब्ध आहेत. एकीकडे छोट्या रोपांना मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे पाच-पाच वर्षे सांभाळूनही त्याला मागणी कमी होत नाही. त्यामुळे मोठ्या झाडांची रोपे कमी केली आहेत.'' 

रोपांसाठींच्या कुंड्याचीही भूरळ
नवनवीन रोपांबरोबरोच त्याच्या रोपनासाठीच्या विविध आकारातील कुंड्याही ग्राहकांना आकर्षित करीत आहे. खारूताई, हरिण, ससा, कासव, बदक, बेडूक आदी प्राणी पक्षांच्या आकारातील सिरॅमिक व प्लास्टीकच्या कुंड्यांच्या उत्पादनांनाही थेट रोपवाटिकेतच बाजारपेठ मिळाली आहे. कुटुंबासह खरेदीसाठी येणारा ग्राहक रोपांबरोबरच या आकर्षक कुंड्याही खरेदी करताना दिसतो.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cactus types trees favoured by customers