Pune News : पुणे जिल्हा परिषदेमार्फत गावे कचरा व सांडपाणी मुक्त करण्यासाठी जोरदार मोहीम |campaign to make villages garbage and sewage free Pune Zilla Parishad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

campaign to make villages garbage and sewage free Pune Zilla Parishad

Pune News : पुणे जिल्हा परिषदेमार्फत गावे कचरा व सांडपाणी मुक्त करण्यासाठी जोरदार मोहीम

मंचर :पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील गावे कचरा व सांडपाणीमुक्त करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. आंबेगाव तालुक्यात संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत २६ गावांमध्ये वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामांचे उद्घाटन, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व हस्तांतरण कार्यक्रम सरपंच, सदस्य व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते गुरुवारी (ता.२३) झाले.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मिलिंद टोणपे, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अवसरी खुर्द, जवळे,पिंपळगाव खडकी, कारेगाव, थुगाव आदी २६ गावांत कार्यक्रम झाले.

अवसरी खुर्द ग्रामपंचायतीच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे व सरपंच कमलेश शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे तज्ञ काळूराम डांगले,

ज्ञानशक्ती विकास वाहिनीचे सांडपाणी व्यवस्थापन तज्ञ प्रवीण खंडागळे, धोंडिभाऊ महाराज शिंदे सदस्या सुवर्णा क्षीरसागर, प्रवीण भोर, वैभव वायाळ, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास भोर, दिनेश खेडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

डांगले म्हणाले “प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामांवर भर द्यावा. जनजागृती करावी.” खंडागळे यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनबाबत माहिती दिली. राजू वायकर, महेश पोळ यांनी व्यवस्था पाहिली. स्नेहा टेमकर यांनी स्वागत केले. विजया राजू भोर यांनी आभार मानले.