भाडेतत्त्वावरील सदनिकांच्या मिळकतकरातील सवलत रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मिळकतकरात ४० टक्के सवलत घेणाऱ्या मिळकतींची पाहणी केली जाणार आहे. वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याआधी भाडेतत्त्वावरील मिळकतींची माहिती मिळकतधारकांनी महापालिकेला द्यायला हवी.
-  रूबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

पुणे - शहरातील भाडेतत्त्वावरील सदनिकांच्या मिळकतकरातील ४० टक्के सवलत रद्द झाली असून, नव्या निर्णयानुसार मिळकतधारकांना पूर्ण कर भरावा लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे. यापूर्वी ४० टक्के सवलत मिळत होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील ज्या मिळकतींचा वापर स्वत: मालक करतात, त्या मिळकतींच्या करात महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागातर्फे ४० टक्के सवलत दिली जाते. मात्र, मिळकतीत मालक राहत असल्याचे दाखवून भाड्याने दिलेल्या सदनिकांसाठी सवलत घेण्यात येतात. या योजनेचा उद्देश साध्य होत नसून, मूळ मालक नसातानही करातील सवलतीचा लाभ घेण्यात येत असल्याच्या प्रचंड तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. परंतु, ही बाब महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत फारशी गांभीर्याने घेतलेली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून आले. 

उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या महसूलवाढ सुधारणा समितीने भाडेकराराने दिलेल्या मिळकतींची सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नव्या आर्थिक वर्षापासून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचनाही महापालिका प्रशासनाला केली आहे. त्यानुसार पुढील वर्षात मिळकतकराच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘‘नवी करवाढ करण्याऐवजी करात सुसूत्रता आणण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मिळकतकरात नियमबाह्य सवलत घेणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. ज्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancellation of rental income tax exemption