
आई आजारी असून तिच्या उपचारांसाठी थेट आमदांशी संपर्क साधून पैसे उकळणाऱ्या उच्चशिक्षित तरुण-तरुणीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली.
महिला आमदारांची फसवणूक करणारे निघाले स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे उमेदवार
पुणे - आई आजारी असून तिच्या उपचारांसाठी थेट आमदांशी संपर्क साधून पैसे उकळणाऱ्या उच्चशिक्षित तरुण-तरुणीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. तरुण-तरुणी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे उमेदवार असून त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या वर्गाचे व अन्य कारणांसाठी पैशांची गरज असल्यामुळे फसवणुकीचा फंडा वापरल्याची माहिती माहिती पोलिसांच्या चौकशीत पुढे आली. दरम्यान, आमदारांच्या फसवणुकीच्या या प्रकाराची राज्यभर चांगलीच चर्चा रंगली होती.
मुकेश अशोक राठोड (रा. वसंत नगर, किनगाव जडू, लोणार, बुलढाणा) याच्यासह औरंगाबादमधील जयभवानी नगर येथे राहणाऱ्या एका तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.
काही दिवसांपुर्वी आमदार माधुरी मिसाळ यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. "आपण तुमच्याच मतदार संघामध्ये राहात असून आईला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यासाठी मदतीची गरज आहे' असे सांगून त्याने मिसाळ यांच्याकडून ऑनलाईन माध्यमाद्वारे पैसे उकळले होते. दरम्यान, मिसाळ यांच्याप्रमाणेच आमदार श्वेता महाले, आमदार मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे यांनाही याच पद्धतीने फसविल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर मिसाळ यांच्या मुलीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर थेट आमदारांचीच फसवणूक केल्यामुळे या प्रकरणाची राज्यभर चांगलीच चर्चा रंगली होती. तर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
...असा घेतला पोलिसांनी शोध !
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीद्वारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी बिबवेवाडी पोलिसांची दोन पथके औरंगाबाद व बुलढाणा येथे पाठविण्यात आली. दरम्यान, संशयित आरोपी औरंगाबाद येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनीस औरंगाबाद येथे सापळा रचून तरुण-तरुणीना अटक केली. परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोडे, गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, उपनिरीक्षक विवेक मिसाळ,अमंलदार अतुल महांगडे, तानाजी सागर,सतिष मोरे यांच्या पथकाने हि कारवाई केली.
दोघेही "एमपीएससी'चे उमेदवार
मुकेश व संबंधित तरुणी दोघेही स्पर्धा परिक्षेची तयारी करत होते. एकाच वर्गात असल्याने त्यांची ओळख झाली. मुकेशने बीए केले असून तरुणीने बीएससी केले आहे. मुकेशचे आई-वडील शेती करतात. त्याच्या शेतातील विहीरचा कठडा तुटल्याने त्याच्या दुरुस्तीसाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. दोघांचीही आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी आणि घरखर्चासाठीही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी गरजु व्यक्तींना आमदार माधुरी मिसाळ या मदत करतात, अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मिसाळ यांना फोन करुन आई आजारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले. त्याच पद्धतीने इतर आमदारांकडूनही त्यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे पैसे घेतल्याची माहिती त्यांच्या चौकशीतुन पुढे आली.
...म्हणून उकळलेले पैसे परत करीत मागितली माफी !
तरुण-तरुणी उच्चशिक्षित असून त्यांनी त्यांच्या अडचणींमुळे फसवणूकीचा मार्ग निवडला. दरम्यान, आपण हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ज्या तीन आमदारांकडून पैसे घेतले होते, त्यांना ते पैसे परत पाठविले. केवळ तेवढ्यावरच न थांबता त्यांची माफी देखील मागितल्याचे त्यांच्या तपासात पुढे आले आहे.
Web Title: Candidates Studying For Competitive Exam Turned Out To Cheating Women Mlas Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..