MPSC च्या उमेदवारांची आर्थिक गणिताची जुळवाजुळव सुरू

candidates worried about financial expenses after MPSC Exam postponed
candidates worried about financial expenses after MPSC Exam postponed
Updated on

पुणे : ‘‘सकाळचा नाश्ता ३०-४० रुपये, दोन वेळचे जेवण १०० ते १५० रुपये, एक दिवसाचे खोली भाडे १०० ते १५० रुपये, असा एका दिवसाचा खर्च जवळपास २५० ते ३५० रुपये होतो. असा हिशोब करून परीक्षेच्या कालावधीपूर्वी एक आठवडा गावाकडून उधारीवर पैसे घेऊन केवळ परीक्षेसाठी पुण्यात आलो. परंतु आता परीक्षा आठ दिवस पुढे ढकलल्यामुळे आर्थिक गणिताची जुळवाजुळव करावी लागणार आहे. रिकामा झालेला खिसा भरण्यासाठी आता पुन्हा दुसऱ्यासमोर हात पसरावे लागणार आहेत,’’ असे सांगत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पुण्यात आलेला एक उमेदवार पानावलेल्या डोळ्यांनी आपली व्यथा मांडत होता. 

आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा’ येत्या रविवारी (ता.१४) होणार म्हणून काही विद्यार्थी पुण्यात केवळ परीक्षेच्या कालावधीसाठी आले होते. परंतु आता परीक्षा २१ मार्च रोजी होणार असल्याने उमेदवारांपुढे पुन्हा आर्थिक तडजोड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात उमेदवारांनी गुरुवारी केलेले आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ‘ही परीक्षा आठ दिवसांतच घेण्यात येईल’, असे मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी रात्री जाहीर केले. त्यानंतरच काही उमेदवारांनी आपल्या बॅगा उचलून गावाकडचा रस्ता धरला, तर पुन्हा ये-जा करायला नको, म्हणून काही विद्यार्थ्यांनी पुण्यातच आणखी परीक्षा होऊपर्यंत राहण्याचे ठरविले. त्यानंतर आयोगाने ही परीक्षा आता २१ मार्चला होईल, असे शुक्रवारी दुपारी जाहीर केले. त्यानंतर काही उमेदवारांनी पुढील आठ दिवस पुण्यातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काहींनी गावाकडे आपल्या घरातील मंडळींकडून, तर काहींनी उधारीवर मित्रांकडून आणखी आठ दिवस पुरतील, इतके पैसे मागून घेतले. आता पुन्हा आठ दिवसांसाठी आर्थिक जुळवाजुळव करावी लागणार, अशा भावना हे विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

पुण्यात 18 वर्षावरील सर्वांना सरसकट लस द्या; कोरोना नियंत्रण आढावा बैठकीची शिफारस

कोल्हापूरमधील आंबवडे (ता. पन्हाळा) गावातून आलेला नयन गुरव शेतकरी कुटुंबातील आहे. तो म्हणाला,‘‘परीक्षा होण्याआधी काही दिवस पुण्यात आलो आहे. येत्या रविवारी परीक्षा होणार म्हणून आधीच परीक्षा केंद्र पाहिले होते, परीक्षेची तयारीही पूर्ण झाली आहे. आता परीक्षा द्यायची, अशा मानसिकतेत होतो. परंतु आता परीक्षा पुन्हा लांबणीवर पडल्याने हिरमोड झाला आहे. परीक्षा लांबणीवर पडली म्हणून पुन्हा गावाकडे जाता येत नाही. कारण गावाकडे गेलो, तर पुन्हा परीक्षेआधी यावे लागेल. अभ्यासातील सातत्यात खंड पडेल. त्यामुळे आता खर्चात वाढत असला, तरीही इथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आई-वडील आणि मित्रांकडून काही पैसे घेतले आहेत.’’ 

‘‘केवळ परीक्षा देण्यासाठी मी काही महिन्यांपूर्वी पुण्यात आले. दररोज नाश्त्यासाठी ३० ते ४० रुपये, मेससाठी दर महिना अडीच ते तीन हजार रुपये, अभ्यासिकेसाठी ६०० ते ८०० रुपये असा खर्च करावा लागता आहे. या खर्चात आणखी आठ दिवसांची भर पडत आहे. त्यामुळे हे जुळवून आणण्यासाठी गावाकडून आई-वडिलांकडून पैसे मागावे लागलेत. आमच्यातील काही उमेदवार हे केवळ परीक्षेपुरते काही दिवसांसाठी पुण्यात आले आहेत. त्यांना तर अतिरिक्त खर्चाची झळ सहन करावी लागत आहे. काही उमेदवार दिवसरात्र अभ्यास आणि एक वेळचे जेवण करूनच दिवस घालवत आहेत.’’ 
- सविता पगार, परीक्षार्थी (नाशिक) 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा आहे एका परीक्षार्थींचा खर्च : 
- नाश्ता : ३० ते ५० रुपये (दर दिवशी) 
- खोली भाडे : १५०० ते ३००० रुपये (दर महिना) 
- अभ्यासिका : ६०० ते ८०० रुपये (दर महिना) 
- खानावळ : १८०० ते २५०० रुपये (दर महिना)

पुण्यात कोणत्या वेळेला काय सुरु, काय बंद? जाणून घ्या सविस्तर नियमावली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com