एमबीबीएसच्या विद्यार्थ्याच्या खुनाच्या निषेधार्थ ससूनमध्ये कॅंडल मार्च | Candle March | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याच्या खुनाच्या निषेधार्थ ससूनमध्ये कॅंडल मार्च
एमबीबीएसच्या विद्यार्थ्याच्या खुनाच्या निषेधार्थ ससूनमध्ये कॅंडल मार्च

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याच्या खुनाच्या निषेधार्थ ससूनमध्ये कॅंडल मार्च

पुणे - यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्याच्या खूनप्रकरणी प्रशासनाकडून योग्य दखल घेण्यात आली नाही. याप्रकरणी बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी शनिवारी सायंकाळी कॅंडल मार्च काढून निषेध व्यक्त केला. ‘जस्टिस फॉर अशोक पाल’ वुई वॉन्ट जस्टिस’ अशा घोषणांनी महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला.

अशोक पाल हा यवतमाळच्या यशवंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अंतिम वर्षाचा एमबीबीएसचा विद्यार्थी होता. त्याचा १० नोव्हेंबर रोजी रात्री अनोळखी व्यक्तीने महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये चाकूने वार करून खून केला. मात्र, तेथील अधिष्ठाता, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी या घटनेची योग्य दखल घेतली नाही. या घटनेच्या आणि प्रशासनाच्या निषेधार्थ तसेच पाल यास श्रद्धांजली देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांनी कँडल मार्चचे आयोजन केले. बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात काढण्यात आलेल्या कॅंडल मार्चमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

हेही वाचा: Daund : कोणार्क एक्सप्रेस मधून ८ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

दोषी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा

‘पाल याच्या खुनामुळे एका कुटुंबाचा आधार गेला आहे. सरकारने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी. पुढे डॉक्टर बनून पाल याने अनेकांचे जीव वाचवले असते. दोषी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच, यापुढे महाविद्यालयांच्या वसतिगृह आणि कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालय आणि पोलिस प्रशासनाने उपाययोजना कराव्यात,’ अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

काय आहे नेमकी घटना

यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात १० नोव्हेंबर रोजी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केवळ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कार्यक्रमात कॅम्पसच्या बाहेरील काही व्यक्ती आल्या होत्या. त्यावरून शिकाऊ डॉक्टर आणि त्यांच्यामध्ये वाद झाला होता. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि पोलिस अधिकारी यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. परंतु या वैमनस्यातून त्यादिवशी रात्री अज्ञात व्यक्तींनी डॉ. अशोक यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

loading image
go to top