Daund : कोणार्क एक्सप्रेस मधून ८ किलो गांजा जप्त; दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daund : भुवनेश्वर- मुंबई कोणार्क एक्सप्रेस मधून ८ किलो गांजा जप्त

Daund : कोणार्क एक्सप्रेस मधून ८ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : भुवनेश्वर- मुंबई कोणार्क एक्सप्रेस मधून आठ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. कुर्डुवाडी ते दौंड रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या गाडीत करण्यात आलेल्या कारवाईत दोन प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी या बाबत माहिती दिली. चित्तरंजन मांझी व पपुन रामचंद्र प्रधान (दोघे रा.धनंजयापुर , गंजाम, ओडिशा ) या दोन प्रवाशांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चार पाकिटात एकूण आठ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: ST STRIKE: विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही - अनिल परब

कुर्डूवाडी (जि. सोलापूर) रेल्वे स्थानकावरून १२ नोव्हेंबर रोजी रात्री कोणार्क एक्सप्रेस दौंडच्या दिशेने रवाना झाल्यावर बी- ६ या डब्ब्यातील दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने गस्तीवरील रेल्वे सुरक्षा दलाचे हवालदार जवळकोटे यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्याची माहिती दिली.

हेही वाचा: मोठी बातमी! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

त्यानंतर कोणार्क एक्सप्रेस दौंड रेल्वे स्थानक येथे आल्यावर बी - ६ मधील प्रवाशांची दौंड लोहमार्ग पोलिस व दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलिसांकडून संयुक्तपणे झडती घेण्यात आली. झडतीत दोघांकडे एकूण आठ किलोग्रॅम गांजा आढळून आला. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक तेजप्रकाश पाल, लोहमार्ग पोलिस दलाचे फौजदार तारांचद सुडगे, रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक फौजदार गुजर व मीना यांनी दोघांना ताब्यात घेतले.

जप्त केलेल्या गांजाचा पंचनामा करण्यात आला आहे. सदर गुन्हा कुर्डूवाडी हद्दीत घडल्याने त्यासंबंधी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करून पुढील तपासाकरिता कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती युवराज कलकुटगे यांनी दिली.

loading image
go to top