छोट्या घरांसाठीही मोटार पार्किंग अनिवार्य

छोट्या घरांसाठीही मोटार पार्किंग अनिवार्य

पुणे - शहरात तुमचे 400 चौरस फुटांचे म्हणजे छोट्या तीन खोल्यांचे घर असेल तर तुमच्याकडे मोटार नसेल, असा समज असण्याचे दिवस आता गेले आहेत. आता अशा पुणेकरांसाठी एका मोटारीसाठीच्या पार्किंगची सोय करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे घराचा आकार जसजसा वाढत जाईल, तसतशी तीन-तीन मोटारींचे पार्किंग असणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र एका बाजूने सायकलींसारख्या मोटारविहिन वाहतुकीला प्राधान्य देण्याचे ढोल सरकार आणि महापालिका बडवत असताना दुसरीकडे सायकलींसाठीच्या राखीव जागांना कात्री लावून पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या आपल्याच धोरणाला सरकारने हरताळ फासला आहे.

वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे निवासी भागाबरोबरच हॉटेल, चित्रपटगृहे, रुग्णालयांसाठीही आता इमारत बांधतानाच पूर्वीपेक्षा दुप्पट पार्किंग निर्माण करावे लागणार असल्याचे विकास नियंत्रण नियमावलीतून (डीसी रूल्स) स्पष्ट झाले आहे. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे घरोघरी वाहनांची संख्या वाढती आहे. त्यामुळे पूर्वी घरटी एक मोटार होती, परंतु आता दोन मोटारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या अनेक प्रकल्पांत वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली.

"पार्किंग'वरून सोसायट्यांत हाणामाऱ्या आता नित्याच्याच झाल्या आहेत. दाट लोकवस्ती भागात तर वाहने रस्त्यावरच उभी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्या नियमावलीमध्ये मोटार अथवा दुचाकी उभी करण्यासाठी किती चौरस फूट जागा आवश्‍यक असते. त्याचा विचार करून प्रति कुटुंब वाहन संख्या गृहीत धरण्यात आली आहे. तेवढी जागा वाहनतळात विकसित करणे विकसकावर बंधनकारक आहे. त्या आधारेच संबंधित इमारतीचा आराखडा मंजूर होणार आहे. तर रुग्णालये, चित्रपटगृह आदी व्यावसायिक आस्थापनांसाठी वाहनतळाची क्षमता वाढविण्याचे बंधन नियमावलीमध्ये घालण्यात आले आहे. निवासी आणि व्यावसायिक वापराच्या आस्थापनांसाठी असलेली पार्किंगची तरतूद 1987 च्या नियमावलीपेक्षा दुपटीने क्षमता वाढविण्यात आली आहे. शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी 1987 च्या नियमावलीमध्ये सायकलींच्या वापराला प्रोत्साहन देण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक वाहनतळात सायकली उभ्या करण्यासाठी जागा ठेवण्यात आली होती. परंतु 2017 च्या नियमावलीमध्ये सायकली उभ्या करण्यासाठीचे क्षेत्र आणि वाहनतळातील सायकलींसाठीची क्षमता घटविण्यात आली आहे. तुलनेत मोटारींसाठी जागेचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे पादचारी पूरक धोरणाच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्याऐवजी वाहन केंद्रित धोरणाचीच अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले.

यांत्रिक वाहनतळ "बोनस'
वाहनतळात यांत्रिकी वाहनतळ उभारण्यास परवानगी होती. त्याची क्षमता इमारतीला परवानगी देताना गृहीत धरली जात होती. परंतु नव्या नियमानुसार वाहनतळाची मूळ क्षमताच गृहीत धरून इमारतीला परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे यांत्रिकी वाहनतळ ही विकसकाने नागरिकांना दिलेली अधिकची सुविधा असेल, असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. परिणामी, विकसकांना आता वाहनतळाच्या धोरणाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

ग्रीन बेल्टमध्येही आता वाहनतळ
दाट वस्तीतील हॉटेल, लॉजेस, हॉस्पिटल, शाळा- कॉलेजेस, मंगल कार्यालय, कोचिंग क्‍लास, औद्योगिक वापर आदींसाठी मोठ्या प्रमाणावर पार्किंग ठेवणे बंधनकारक आहे. विकास आराखड्यात दाखविलेली आरक्षित जागा महापालिकेस देण्यासाठी टीडीआर स्वरूपात मोबदला घ्यायचा असल्यास त्या क्षेत्राच्या तिप्पट टीडीआर जागा मालकास मिळेल. तसेच आरक्षित केलेल्या भूखंडांवर एखाद्या ठिकाणी वाहनतळ उभारायचा असल्यास त्याचे अधिकार महापालिका आयुक्तांनाही देण्यात आले आहेत. वाहनतळाची समस्या दूर करण्यासाठी ग्रीन बेल्टमध्येही आता वाहनतळ निर्माण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

1500 चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराच्या सदनिकेसाठी - 3 कार, 2 दुचाकी, 2 सायकली - 800 ते 1500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांसाठी - 2 कार, 2 दुचाकी, 2 सायकली- 400 ते 800 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांसाठी - 2 कार, 4 दुचाकी, 2 सायकली- 400 चौरस फटांपेक्षा कमी आकाराच्या दोन सदनिकांसाठी - 1 कार, 4 दुचाकी, 4 सायकली

हॉटेल - लॉज (प्रति 5 रूमसाठी) ः 3 मोटारी, 4 दुचाकी, 4 सायकली - मल्टिफ्लेक्‍स (प्रत्येकी 40 सीटसाठी) ः 6 मोटारी, 16 दुचाकी, 4 सायकली - मंगल कार्यालय, सभागृह ः 5 मोटारी, 20 दुचाकी, 8 सायकली - रुग्णालये (प्रत्येकी 10 बेडसाठी) ः 3 मोटारी, 12 दुचाकी, 10 सायकली.

शासकीय, निमशासकीय, खासगी व्यावसायिक केंद्र (प्रति 1000 चौरस फुटांसाठी) ः 3 मोटारी, 15 दुचाकी, 4 सायकली

1000 चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या भूखंडात दुकान किंवा रो हाउससाठी पार्किंग आवश्‍यक नाही. 3000 चौरस फुटांच्या स्वतंत्र बंगल्यात एकच कुटुंब राहत असल्यास स्वतंत्र पार्किंग ठेवण्याची गरज नाही. अनेक इमारतींसाठी एकत्रितरीत्या पार्किंग क्षेत्र ठेवता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com