

मोटारीच्या काचा फोडून रोकड लुटली
पिंपरी : थेरगाव येथे मोटारीच्या काचा फोडून तरुणाला कोयत्याचा धाक दाखवत त्याच्याकडील रोकड लुटली.
या प्रकरणी वैभव नळगिरे (रा. वनदेवनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नीरज सोळंके आणि सूरज सोळंके (दोघेही रा. थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीने त्याची मोटार थेरगाव येथील आनंद हॉस्पिटल जवळ उभी केली होती. दरम्यान तेथे आलेल्या आरोपींनी फिर्यादीच्या मोटारीच्या काचा पेव्हर ब्लॉक, वीट आणि कोयत्याने फोडल्या. फिर्यादी आरोपींना अडवण्यास गेला असता आरोपी नीरजने हातातील कोयता वैभवच्या गळ्याला लावला आणि सुरजने त्यांच्या खिशातील दीड हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली.
एपीके फाईलद्वारे ज्येष्ठाची फसवणूक
पिंपरी : मोबाईलवर आलेली एपीके फाईल डाऊनलोड करण्यास सांगून पिंपळे गुरव येथील एका ज्येष्ठ नागरिकाची ६ लाख ७० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी पिंपळे गुरव येथील ६१ वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादीला एक एपीके फाईल डाऊनलोड करण्यास सांगितली. त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून ६ लाख ७० हजार रुपये काढून घेत फिर्यादीची फसवणूक केली.
मोटारीच्या धडकेत पादचारी जखमी
पिंपरी : वाकडमधील कस्पटे चौक येथे मोटारीने दिलेल्या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला.
दुर्गप्पा म्हेत्रे (रा. पिंपळे सौदागर) असे या अपघातात जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी देवप्पा म्हेत्रे (रा. पिंपळे सौदागर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोटार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. म्हेत्रे हे बालेवाडी ते पिंपळे सौदागर या रस्त्याने पायी जात असताना कस्पटे चौकात मोटारीने त्यांना जोरात धडक दिली. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली.
कुदळवाडीतून दुचाकी चोरी
पिंपरी : कुदळवाडी, चिखली येथे रस्त्यालगत उभी केलेली दुचाकी अज्ञात चोराने चोरून नेली.
या प्रकरणी कासीम अली रहमानी (रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी त्यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी कुदळवाडी येथील एका वजन काट्याजवळ लॉक करून उभी केली होती. दरम्यान, ती चोरून नेली.