वेलदोडा ३०० रुपयांनी महाग

महेंद्र बडदे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे - केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे तेथील वेलदोडा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पुण्यातील बाजारात वेलदोड्याचे भाव प्रतिकिलोमागे ३०० ते ४०० रुपयांनी वधारले आहेत. ऐन हंगामात ही स्थिती निर्माण झाल्याने पुढील काळात भावात तेजी राहण्याची शक्‍यता आहे.

पुणे - केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे तेथील वेलदोडा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पुण्यातील बाजारात वेलदोड्याचे भाव प्रतिकिलोमागे ३०० ते ४०० रुपयांनी वधारले आहेत. ऐन हंगामात ही स्थिती निर्माण झाल्याने पुढील काळात भावात तेजी राहण्याची शक्‍यता आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे केरळ राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. साधारणपणे जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून वेलदोड्याची नवीन आवक सुरू होत असते. ऐन हंगामातच पुराचा फटका या उत्पादनाला बसला आहे. देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वेलदोड्यामध्ये केरळचा वाटा हा ७० ते ८० टक्के इतका आहे. देशांत आणि परदेशांत येथील वेलदोडा विक्रीला पाठविला जात असतो. डोंगर उतारावर या वेलदोड्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाचा उत्पादनावर परिणाम किती झाला, हे आत्ता स्पष्ट होणार नाही, असे व्यापारी रमेशभाई पटेल यांनी सांगितले. ‘‘पुढील आठ ते दहा दिवसांत याचा अंदाज मिळण्याची शक्‍यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार वेलदोड्याच्या पन्नास टक्के उत्पादनाला फटका बसल्याचा अंदाज आहे.  पाऊस कमी झाल्यानंतर प्रत्यक्षात आकडेवारी समोर येईल. सध्या आवक कमी असल्याने वेलदोड्याच्या भावांत तेजी निर्माण झाली आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.  ऑगस्ट ते सप्टेंबर हा कालावधी वेलदोड्याचा हंगाम असतो असे नमूद करीत व्यापारी अक्षय जैन म्हणाले, ‘‘साधारणपणे ऑक्‍टोबर मध्यावधीपर्यंत हा हंगाम चालतो. त्यानंतर बाजारात नवीन वेलदोड्याची आवक कमी होत जाते. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रतिकिलो भावांत ३०० ते ४०० रुपये इतकी वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीच्या वेलदोड्याचे प्रतिकिलोचे भाव १७२५ रुपये, त्यापेक्षा कमी दर्जाच्या वेलदोड्याच्या प्रतिकिलोचा भाव १६५० आणि १५५० रुपये इतका झाला आहे.’’ 

देशांत केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, सिक्कीम आणि पश्‍चिम बंगाल या राज्यात वेलदोड्याचे उत्पादन होते. यामध्ये केरळमधील वेलदोडा हा प्रामुख्याने खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. इतर राज्यांत त्याचे उत्पादन कमी आणि वेगळ्या जातीच्या वेलदोड्याचे होते. 

केरळमधील तीन वर्षांतील  उत्पादन 
२०१५-१६     २१ हजार ५०३ टन 
२०१६-१७     १५ हजार ६५० टन 
 २०१७ -१८     १८ हजार ३४६ टन

Web Title: Cardamom is expensive by 300 rupees