व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी

व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी

सध्याच्या जागतिकीकरणाच्या, उदार व्यवस्थेच्या व मोठ्या प्रमाणावरील खाजगीकरणाच्या युगात उत्पादन व सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. शिक्षणाच्या आधारे जागतिक बाजारपेठेत योग्य कलाकौशल्य विकसित केल्यास मनुष्यबळाला मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. जागतिक स्पर्धेच्या युगात आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत पातळीवर कार्यरत उत्पादन व सेवा क्षेत्रात आधुनिकीकरणाद्वारे वेगाने विकास होत आहे. परिणामी विविध क्षेत्रात व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत.
भारतासारख्या विकसनशील खंडप्राय देशात बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे व परकीय थेट गुंतवणुकीच्या ओघामुळे देशांतर्गत औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना
मिळालेली आहे. परिणामी व्यवस्थापनाच्या व कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने उच्चस्तरीय व निम्नस्तरीय अशा दोन्ही स्तरांवर व्यवस्थापनातील मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. बारावीनंतर व्यवस्थापन पदवीनंतर सीए, सीएस, कॉस्टींग, कायदा, संगणक माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, पर्यटन, विमा, हॉस्पिटॅलिटी, मनुष्यबळ विकास, विपणन, आंतरराष्ट्रीय व्यापार, पत्रकारिता, जाहिरात अशा क्षेत्रांत कुशल व्यवस्थापनाचे ज्ञान व तंत्रकौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाला रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
देशातील युवकांना स्वत:चा उद्योग, व्यवसाय स्थापन करता यावा, म्हणून केंद्र व राज्य शासन विविध संस्थांच्या माध्यमातून रोजगाराभिमुख बनवत आहेत. बेरोजगारी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मागील चार-पाच वर्षांपासून कौशल्य, तंत्र विकासाच्या अनेक योजनांना विविध स्तरांवर गती देत देशांतर्गत कुशल मनुष्यबळ निर्मितीचा प्रयत्न सुरू केला आहे. उद्योग क्षेत्राला वाव मिळण्यासाठी विविध सवलतींच्या आधारे स्टार्टअप सुरू करण्यास अर्थसहाय्य, प्रेरणा व मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले आहे. वेगाने प्रगती करणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा म्हणजे कुशल व्यवस्थापकीय मनुष्यबळ. कारण संघटनेची, व्यवस्थापनाची, उद्योगांच्या यश-अपयशाची किल्ली ही व्यवस्थापकाच्या हाती असते. त्यामुळे बहुतांश विविधांगी ज्ञान, कला कौशल्य, तंत्रज्ञान आत्मसात केलेल्या मनुष्यबळास देशात व परदेशात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. व्यवस्थापन शिक्षणाकडे सध्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढत असण्याचे कारण म्हणजे या क्षेत्रात निर्माण होत असलेल्या करिअरच्या संधी.
व्यवस्थापन क्षेत्रात उच्चतम करिअर निर्माण करण्याच्या दृष्टीने भारताच्या आयएमएम, आयआयटी व अनेक तत्सम संस्था कार्यरत आहेत. पदवीनंतर विविध क्षेत्रांत व्यवस्थापनातील करिअर करण्याच्या दृष्टीने अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बारावीचा टप्पा पार केल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, व्यवस्थापनातील विविध प्रकार, आर्किटेक्चर, बँकिंग, विमा, पर्यटन व अनेक वित्तीय संस्थांमध्ये करिअरच्या संधी आहेत. यावर्षी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सुरुवातीची तीन वर्षे सर्व प्रकारचे मूलभूत ज्ञान प्रदान केले जाते व पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे त्यांना व्यवस्थापकीय शिक्षण, तंत्र कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे यशस्वी व्यवस्थापक होण्याच्या दृष्टीने तयार केले जाते. व्यवस्थापनाच्या तत्त्वानुसार व्यवस्थापन हे प्रमुख दिशादर्शक, विकसन प्रेरणा, योग्य नियोजन, नियंत्रण, भविष्याचा वेध ही तंत्रे विकसित होणे गरजेचे असते.
सध्या सगळीकडे स्टार्टअपचे वारे वाहत आहेत. व्यवस्थापन क्षेत्राची आवड असणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर उद्योग क्षेत्राकडे आकर्षित होत आहे. व्यवस्थापन शिक्षणाद्वारे स्टार्टअपच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगार व उद्योगक्षेत्रास मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्याने प्रामुख्याने विविध क्षेत्रांत पदवी, पदव्युत्तर, तांत्रिक व्यावसायिक शिक्षण प्राप्त केलेल्या कुशल व्यवस्थापकाची गरज निर्माण होणार आहे. खाजगी क्षेत्रातील स्थानिक व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रामुख्याने वित्त विभाग, लेखा विभाग, मनुष्यबळ विभाग, आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन, मार्केटिंग, प्रशासन विभाग, स्टार्टअप विभाग, स्ट्रॅटेजिक व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, संगणक क्षेत्र, बँकिंग, कायदा, पर्यटन, उद्योगक्षेत्रातील कौशल्य आधारित क्षेत्र, रिटेल मॅनेजमेंट, पॅरामेडिकल, आदरातिथ्य, फॉरेन्सिक अकाउंट, इव्हेट मॅनेजमेंट, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, जाहिरात बॅनर व्यवस्थापन, उत्पादन क्षेत्र, हेल्थ करिअर मॅनेजमेंट, मॅनेजमेंट इन्फर्मेटिक्स, निधी व्यवस्थापन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट, वाहतूक क्षेत्र व तत्सम अनेक कंपनी कामाच्या प्रकियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी उत्पादने व सेवा वितरीत करण्यासाठी योग्य अशा व्यवस्थापकाची गरज असते.
व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रामुख्याने वरील व इतर अनेक उपपर्याय उपलब्ध आहेत. मात्र व्यवस्थापकीय क्षेत्रात यशस्वी कारकीर्द करण्यासाठी खालील गोष्टीही महत्वाच्या आहेत. उद्योगाचे यशापयश हे व्यवस्थापकाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते त्यासाठी प्रामुख्याने
ज्या क्षेत्राची आवड व मूलभूत ज्ञान आहे त्याच व्यवस्थापन क्षेत्राची निवड करणे
विविध स्तरावरील व्यवस्थापनाच्या संधी प्राप्त करताना आपली क्षमता समजावून घेणे
सध्याच्या युगात सर्व क्षेत्रांत ज्ञानाबरोबरच संबंधित तंत्रकौशल्य आत्मसात करणे
व्यवसाय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणाबरोबर पदवी, पदविका, शिक्षणाद्वारे आपल्या कारर्कीदीचा प्रारंभ होऊ शकतो
कुशल व्यवस्थापक होण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्त्व, संवाद कौशल्य, सादरीकरण, ज्ञान आवश्यक असते.
प्रयोगशीलता अंगी असणे महत्त्वाचे आहे कारण धाडसाशिवाय योग्य निर्णयक्षमता निर्माण होत नसते.
सतत विकसित होणाऱ्या ज्ञानाचा अंगीकार संशोधनाद्वारे प्राप्त करणे
अनेक माध्यमे, संस्था, तज्ज्ञ व्यक्तींद्वारे मार्गदर्शन घेता येते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवस्थापक हा उद्योग व्यवसाय व रोजगाराचा कणा असल्याने सर्वांना तो जबाबदार ठरतो. त्यामुळे बहुव्याप्त असे समाज ज्ञान, राजकीय परिस्थिती, पर्यावरण बदल, ग्राहक वर्गातील बदल यांची माहिती गरजेची असते. उत्पादन, सेवा, विक्रय व्यवस्थापन अशा बाबींच्या अंतर्गत अनेक क्षेत्रांत व्यवस्थापकाची गरज असते.
आजच्या युगात केवळ एमबीए हा एकच पर्याय नसून उपरोक्त क्षेत्रांतील अनेक अभ्याक्रमांद्वारे व्यवस्थापनाचे शिक्षण घेता येते. तुमचे गुण महत्त्वाचे आहेत, परंतु त्याच बरोबर तुमची आवड, क्षमता, कला कौशल्ये, संभाषण कौशल्य, सादरीकरणाची क्षमता, कल्पकता याद्वारे योग्य व्यवस्थापन संधीची निवड करत आपली कारकीर्द यशस्वी करु शकता.

- प्रा. डॉ. मिलिंद आळंदीकर
उपप्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com