दौंड : ॲट्रॉसिटी व दंगल प्रकरणी माजी नगराध्यक्षासह आठ जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daund Police Station

दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात २० ऑक्टोबर रोजी एका तरूणीचा रशीद शेख व इलियास शेख यांनी भररस्त्यावर विनयभंग केला.

दौंड : ॲट्रॉसिटी व दंगल प्रकरणी माजी नगराध्यक्षासह आठ जणांवर गुन्हा

दौंड - दौंड शहरात तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणार्या महिला व तरूणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्यासह एकूण आठ जणांविरूध्द २१ दिवसांच्या विलंबानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंग व ॲट्रॉसिटी प्रकरणात टोळक्याविरूध्द त्वरित कारवाई करण्याऐवजी फिर्याद नसल्याचे कारण पुढे करून कारवाई टाळणे दौंड पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे.

दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात २० ऑक्टोबर रोजी एका तरूणीचा रशीद शेख व इलियास शेख यांनी भररस्त्यावर विनयभंग केला. तरूणीचे नातेवाईक त्या तरूणांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्या तरूणांनी त्यांनाच दांडक्याने बेदम मारले. त्यानंतर टोळक्याने त्यांच्या घरी धुडगुस घालीत डोक्यात तलवारीने वार करण्याबरोबर दांडक्याने दात पाडून एकूण सात जणांना गंभीररित्या जखमी केले.

सदर घटनेनंतर तरूणीचे कुटुंबीय दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास गेले असता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे टोळकेच परस्परविरोधी फिर्याद देतील, अशी भीती दाखविण्यात आली. दरम्यान पीडित तरूणीने एका केंद्रिय आयोगाकडे धाव घेतल्यानंतर दौंड पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.

या बाबत तरूणीच्या फिर्यादीवरून ९ नोव्हेंबर रोजी माजी नगराध्यक्ष बादशहा आदम शेख, त्याचा मुलगा वसीम बादशहा शेख, रशीद ईस्माइल शेख, वाहिद खान, आरबाज सय्यद, जुम्मा शेख, इलियास ईस्माइल शेख, जिलाणी शेख ( सर्व रा. कुंभार गल्ली, दौंड) व इतर १० ते १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करणे, आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

बादशहा शेख सलग २९ वर्षे नगरसेवक असून त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दौंड नगरपालिकेतील गटनेता व पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य म्हणून काम पाहिले आहे.